Join us

मुंबई विमानतळावर २१ कोटींचे अमली पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या कहरातही अमली पदार्थांची तस्करी थांबलेली नाही. मुंबई विमानतळावर नुकतेच एका झाम्बियन महिलेकडून तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या कहरातही अमली पदार्थांची तस्करी थांबलेली नाही. मुंबई विमानतळावर नुकतेच एका झाम्बियन महिलेकडून तीन किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. त्याचे बाजारमूल्य सुमारे २१ कोटी रुपये इतके आहे.

जुलियाना मुटाले असे या महिलेचे नाव आहे. एक महिला मुंबई विमानतळावर अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर यंत्रणेला (डीआरआय) मिळाली होती. त्याआधारे सापळा रचण्यात आला. या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तिची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्या बॅगेत तीन किलो हेरॉइन सापडले.

संबंधित महिला जोहान्सबर्गहून दोहामार्गे मुंबईत दाखल झाली. त्याआधी झाम्बियातून दक्षिण आफ्रिकेत पोहोचण्यासाठी तिने अनेक दलालांशी संपर्क साधला. हे सर्व दलाल आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळी चालवत असून, ते मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचा संशय आहे. ही महिलाही त्या टोळीचा भाग असल्याचे समजते.

जोहान्सबर्गमध्ये सोपवण्यात आलेले ड्रग्जचे पाकीट मुंबईत पोहोचवायचे होते. मात्र, ज्याच्याकडे ते द्यायचे होते त्याबद्दल काहीही माहिती नव्हती. आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, आर्थिक अडचणींतून सावरण्यासाठी ड्रग्जची तस्करी करत असल्याची कबुली या महिलेने दिली. तिच्याकडे बिझनेस व्हिसा असून ती पहिल्यांदाच भारतात आली होती. सध्या तिला भायखळ्यातील महिला कारागृहात ठेवण्यात आले आहे.

.............................................