श्रीलंकन बोटीतून तीन हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:18+5:302021-03-26T04:07:18+5:30
तटरक्षक दलाची कारवाई : १९ खलाशांना तपासासाठी केरळमध्ये नेले लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाने केलेल्या ...
तटरक्षक दलाची कारवाई : १९ खलाशांना तपासासाठी केरळमध्ये नेले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाने केलेल्या धडक कारवाईत श्रीलंकन बोटीतून तब्बल ३०० किलोंच्या अमली पदार्थांच्या साठ्यासह पाच एके-४७ रायफल आणि एक हजार जिवंत फेऱ्या झाडता येतील इतक्या जिवंत काडतुसांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
अरबी समुद्रातून अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने हवाई आणि सागरी मार्गाने तपास मोहीम हाती घेतली. लक्षद्वीप बेट समूहांच्या सागरी सीमेत १८ मार्च रोजी तीन संशयास्पद बोटींना रोखण्यात आले. या बोटींच्या तपासणीनंतर ३०० किलो हेराॅईनचा साठा हस्तगत करण्यात आला. जागतिक बाजारपेठात याची किंमत साधारण तीन हजार कोटी असल्याचे तटरक्षक दलाने स्पष्ट केले. जप्त केलेल्या मुद्देमालासह या बोटीवरील १९ खलाशांना पुढील तपासासाठी केरळमध्ये नेण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली.
अलीकडच्या काळात तटरक्षक दलाने केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी ५ मार्चला अन्य एका श्रीलंकन बोटीतून २६० किलोंचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता, तर गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात एक हजार कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईत १.६ टन अमली पदार्थ पकडण्यात आले. याची जागतिक बाजारातील किंमत साधारण पाच हजार कोटींच्या घरात आहे. आजवर तटरक्षक दलाने विविध कारवायांमधून तब्बल १० हजार ९५२ कोटी किमतीच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती दलाने दिली आहे.