ढोल-ताशा पथकांनाही कोरोनाचा फटका; गणेश मिरवणुका बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 03:14 AM2020-07-19T03:14:57+5:302020-07-19T06:05:41+5:30
गणपती उत्सवात मुंबई-पुण्यात ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.
मुंबई : नेहमीप्रमाणे गणपती आगमन व विसर्जन सोहळ्यावेळी दिसणाऱ्या भव्य मिरवणुका व त्याला ढोल पथक, लेझीमची मिळणारी साथ यंदा दिसणार नाही. कोरोनाचा ढोल पथकांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोनामुळे मुंबई-पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळे यावर्षी साधेपणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार असल्याने याचा फटका अनेक घटकांना बसणार आहे, तसाच तो डबेवाल्यांच्या ‘ढोल पथकांना’ बसला आहे.मुंबईत डबेवाल्यांची अनेक ढोल पथके कार्यरत आहेत. एकीकडे लॉकडाऊनपासून कोरोनामुळे डबेवाल्यांचा रोजगार बुडाला असताना आता गणपतीतही ढोल पथकांची आर्थिक घडी विस्कटणार आहे.
गणपती उत्सवात मुंबई-पुण्यात ढोल पथकांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या मागणीमुळे दोन तास वाजवण्याची १५ ते २० हजार रुपये बिदागी या पथकांना मिळत असे. प्रकारे प्रत्येक ढोल पथकाला लाखो रुपयांची कमाई मिळत असे. मात्र आता त्यांना या कमाईला मुकावे लागणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, डीजेवर उच्च न्यायालयानेच बंद आणली आहे़ त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून मिरवणुकांमध्ये डीजे वाजत नाहीत़ परिणामी सर्व गणेश मंडळे मिरवणुकांसाठी ढोल-ताशा पथकाची व्यवस्था करतात़ पथकांचीही या दिवसांमध्ये चांगली कमाई होते़ या पथकांमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी अधिक असतात़ त्यांनाही पैसे मिळतात़ काही गणपती तर मानाचे असतात़ अशा मंडळांकडून काही पथके पैसेही घेत नाहीत. कोरोनामुळे हे सर्व या वर्षी थांबणार आहे़