धुळवडीत ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ वाढले
By admin | Published: March 25, 2016 01:14 AM2016-03-25T01:14:56+5:302016-03-25T01:14:56+5:30
होळी, धुळवड आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेसमध्ये यंदा वाढ झाल्याचे दिसून आले. तर सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे डोळ्यांना इजा
मुंबई : होळी, धुळवड आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेसमध्ये यंदा वाढ झाल्याचे दिसून आले. तर सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे डोळ्यांना इजा होण्याच्या प्रमाणात मात्र घट झाली.
धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन वाहने चालवताना वाहनचालकांकडून अन्य नियमही धाब्यावर बसविले जातात. अशा वाहनचालकांची वाहतूक पोलिसांकडून धरपकड करून दंडात्मक कारवाईही केली जाते. गुरुवारी, धूलिवंदनाच्या दिवशी एकूण १२,८३६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. पवईत दारूच्या नशेत ट्रिपल सीट बाइक चालवणाऱ्यांना लॅण्ड क्रूझरने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली.
धूलिवंदनाच्या दिवशी वाहनचालकांकडून सर्रासपणे नियम धाब्यावर बसविले जातात. त्यामुळे अशा चालकांना जाळ्यात पकडण्यासाठी या वेळी मुंबई वाहतूक पोलिसांनी चांगलीच व्यूहरचना आखली होती. शहर आणि उपनगरात यासाठी १५० अधिकारी आणि १ हजार १४१ हवालदार ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. वांद्रे, नागपाडा, पायधुनी, साकीनाका, मालाड, अंधेरी, कांदिवली, बोरीवली, चेंबूरसह अन्य काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत होती.
पोलिसांचे विशेष लक्ष हे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालक आणि वाहनांवर होते. त्याचबरोबर ट्रिपल सीट आणि अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांचीही धरपकड केली जात होती. गुरूवारी रात्री ८ वाजेपर्यंत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ६७७ वाहनचालकांची धरपकड केली. तर त्यानंतरच्या दोन तासांनंतर हाच आकडा तब्बल ८८ पर्यंत गेला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विविध गुन्ह्यांखाली एकूण ६ हजार ४०७ केसेस दाखल झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
मागील वर्षी विविध गुन्ह्यांतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल ५ हजार ८६२ दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालक अडकले होते. होळीच्या दिवशी एकूण ४०९ तर धूलिवंदनाच्या दिवशी तब्बल ५ हजार ४५३ केसेस दाखल झाल्या होत्या. यामध्ये होळीच्या दिवशी दारू पिऊन वाहन चालविण्याच्या १३० केसेस तर धूलिवंदनाच्या दिवशी २७९ केसेस दाखल होत्या.
दोन बालकांच्या डोळ्यांना इजा
जेजे रुग्णालयात दिवसभरात ७ रुग्णांना उपचारासाठी आणण्यात आले. त्यात एका १० महिन्यांच्या बाळाचा तर एका २० दिवसांच्या बाळाचा समावेश आहे. १० महिन्यांच्या बाळाचे आई-वडील रंग खेळत असताना या बाळाच्या डोळ्यात रंग उडाल्याने त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. तर अन्य एका २० दिवसांच्या बाळाच्या डोळ्यातही रंग गेल्याने त्याला दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू असल्याने अधिक तपशील मिळू शकला नाही. तर रंगासोबत डोळ्यात चुना गेल्याने एका ७ वर्षीय मुलीने ५० टक्के दृष्टी गमावली आहे. या मुलीचे नाव प्राजक्ता राव असून ती परेलची राहणारी असल्याचे सांगण्यात आले.
रंगांमुळे ४६ जणांच्या डोळ्यांना इजा
धूलिवंदनाच्या दिवशी रंग खेळताना शहर-उपनगरांतील तब्बल ४६ व्यक्तींच्या डोळ्यांना किरकोळ इजा झाली आहे. यातील केईएम रुग्णालयात ४, सायन रुग्णालयात १ रुग्ण तर नायर रुग्णालयात १ रुग्णाला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. इतर रुग्णांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले.
धूलिवंदन, रंगपंचमी खेळताना रासायनिक रंगांचा वापर करू नये, असे आवाहन वेळोवेळी सामाजिक संस्था आणि विविध माध्यमांतून करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी मुंबईकरांनी अधिक सजगतेने रंगांची उधळण केली. गेल्या वर्षी ५३ मुंबईकरांच्या डोळ्यांना रंगपंचमीच्या दिवशी इजा झाली होती.
याविषयी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, यंदा रंगांमुळे डोळ्यांना इजा झालेल्या रुग्णांची संख्या कमी दिसून आली. त्यात गंभीर दुखापत झालेले कोणीही नव्हते. विविध माध्यमातून झालेल्या जनजागृतीमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत काही व्यक्तींना डोळ्यांशी संबंधित काहीही तक्रारी आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोळीवाड्यात डोक्यावर माठ घेऊन होळी साजरी
मुंबईतील विविध कोळीवाड्यांत गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. शिवडी कोळीवाड्यातदेखील महिलांनी पारंपरिक वेशात डोक्यावर माठ घेऊन होळी साजरी केली. ही होळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
शिवडी-कोळीवाडा ही शंभर वर्षांहून अधिक जुनी कोळी वस्ती आहे. येथे सर्वच सण पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. त्यात होळीच्या सणाला अधिक महत्त्व आहे. महिला एकाच प्रकारचे कपडे परिधान करून सजावट केलेले माठ डोक्यावर घेऊन परिसरात वाजतगाजत मिरवणूक काढतात.
पारंपरिक पद्धतीने उभ्या केलेल्या होळीभोवती फेऱ्या मारून महिला डोक्यावर घेतलेले माठ होमात अर्पण करतात. उसाच्या पेंढ्यांचेही दहन या वेळी केले जाते. नकारात्मक विचार संपून सकारात्मक विचारांनी समाज घडेल, अशा भावनेने स्थानिक यात सहभागी होतात. शंभर वर्षांपूर्वी जोसेफ कोळी यांनी सुरू केली होती.