Mumbai Accident ( Marathi News ) : मुंबईतील लालबाग परिसरात बेस्ट बसला झालेल्या अपघातात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. एका मद्यधुंद प्रवाशाने बेस्ट बस चालकासोबत हुज्जत घालत नंतर थेट स्टेअरिंगवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील ३ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची ६६ क्रमांकाची इलेक्ट्रिक बस दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात होती. ही बस लालबाग परिसरात गेल्यानंतर बसमधून प्रवास करत असलेला एक मद्यधुंद व्यक्ती चालकापाशी गेला आणि त्याने झटापट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सदर व्यक्तीने थेट बसचे स्टेअरिंग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी बस अनियंत्रित झाली आणि या बसने पादचाऱ्यांसह कार आणि दुचाकींना धडक दिली. या अपघातात ९ प्रवासी जखमी झाले असून ३ जण गंभीर आहेत.
दरम्यान, अपघाताबाबतची माहिती मिळताच काळचौकी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढत उपचारासाठी रवाना केलं. तसंच अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.