Join us

नशेसाठी बूटपॉलीश, व्हाइट इंक

By admin | Published: July 29, 2014 12:12 AM

मागील अडीच वर्षांत अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल करून ठाणे पोलिसांनी ३६ लाखांहून अधिक किमतीचा चरस आणि गांजा हस्तगत केला आहे.

पंकज रोडेकर, ठाणेइतर शहरांप्रमाणे ठाण्यात नशेसाठी तरी कोकेन, हेरॉइन, ब्राऊन शुगर यासारख्या महागड्या अमली पदार्थांचा वापर होत नसून त्याऐवजी चरस आणि गांजाबरोबर शूपॉलीश, व्हॉइट इंक आणि आयोडेक्सचाही सर्रास वापर होत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मागील अडीच वर्षांत अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल करून ठाणे पोलिसांनी ३६ लाखांहून अधिक किमतीचा चरस आणि गांजा हस्तगत केला आहे. तसेच २० तस्करांना जेरबंद केले आहे. या हस्तगत मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत करोडो रुपये किंमत असल्याचे बोलले जाते.ठाणे शहर अमली पदार्थविरोधी पथकाने २०१२ मध्ये ८ गुन्हे दाखल करून १२ जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून १४ लाख ८ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत क रण्यात आला. तसेच २०१३ या वर्षी पोलिसांनी ३ गुन्हे दाखल करून ८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १६ लाख ८ हजार ८५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच २०१४ मधील पहिल्या सात महिन्यांत (जाने.-जून) ठाणे शहर पोलिसांनी १ गुन्हा दाखल करून २ जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून ३९ किलो ९८० ग्रॅम वजनाच्या गांजासह कार असा ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ठाण्यात नशेसाठी चरस आणि गांजाचा वापर होत असल्याचे पोलीस कारवाईत दिसत आहे. हे अमली पदार्थ मुख्यत: काश्मीर, नेपाळ आणि उत्तर प्रदेश या भागांतून आणण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. काही तरुण बूटपॉलीश व व्हॉइट इंकच्या आहारी गेल्याचे आढळले आहे़ याचदरम्यान चरस आणि गांजाच्या तस्करीस आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी कारवायांबरोबरच शाळा-महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणात जनजागृतीच्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. तसेच तस्करी करणाऱ्या एका टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली.