दारूच्या नशेत तरुणाने स्वत:ला पेटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:41 AM2018-09-22T02:41:08+5:302018-09-22T02:41:10+5:30
दारूच्या नशेत एका तरुणाने पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला.
मुंबई : दारूच्या नशेत एका तरुणाने पोलीस ठाण्याच्या आवारातच स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अंधेरी परिसरात पत्नी, आई आणि वडिलांसोबत राजेश रमेश आंबोणकर (३१) राहतो. राजेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याला दारूचे व्यसन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज घरी दारू पिऊन तो आई आणि वडिलांना मारहाण करतो. तसेच शेजाऱ्यांनादेखील शिवीगाळ करत असल्याने त्याचे कोणाशीच पटत नाही. आई-वडिलांनी घर त्याच्या नावावर करावे म्हणून तो त्यांना सतत छळत असतो. यात त्याला त्याच्या पत्नीचीही साथ असते. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तो दारूच्या नशेतच एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नीसोबत आई-वडिलांविरुद्ध तक्रार करण्यासाठी आला. मात्र नंतर येतो असे सांगत तो पुन्हा पोलीस स्टेशनमधून निघून गेला.
तितक्यात त्याचे आई-वडील मारहाणप्रकरणी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी रिक्षाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांना पाहून राजेशने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून दारूच्या नशेत स्वत:ला पेटवून घेतले. ही बाब एमआयडीसी पोलिसांना समजताच त्यांनी धावपळ करत कशीबशी आग विझवली आणि राजेशला रूग्णालयात दाखल केले़