मुंबई : दारूच्या नशेत विवाहितेने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मालाड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिंदे यांनी प्रसंगावधान साधत तिचा जीव वाचविला. यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे.
मालाडच्या चिंचोली पार्क परिसरात ही घटना घडली. विवाहित ३५ वर्षीय महिला तिच्या इंजिनिअर पतीसोबत वरळीला राहते. शनिवारी ती मालाडला राहणाऱ्या तिच्या आईच्या घरी आली होती. या दोघांची सतत काही ना काही कारणावरून भांडण व्हायची. मालाडमध्ये आल्यानंतर देखील तिने दारू पीत टेरेसवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब जेव्हा मालाड पोलिसांना समजली तेव्हा ती कॉन्स्टेबल शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पतीला बोलण्यात गुंतवायला सांगत त्यांनी महिलेला धरून खाली उतरविले. नवरा बायकोचा जबाब नोंदवून त्यांना तंबी देत सोडण्यात आले. शिंदे यांच्या या धाडसाबाबत गृहमंत्री देशमुख यांनी घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत कौतुक केले तर वरिष्ठांनी देखील त्यांची पाठ थोपटली.