Join us

दारुबंदी अधीक्षक लाच खटल्यात निर्दोष; हायकोटाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 3:02 AM

फिर्यादीबाबत व्यक्त केली शंका

मुंबई : देशी दारु दुकानाच्या मुदत संपलेल्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी दुकानदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेतल्याच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने दारुबंदी खात्याच्या रत्नागिरी कार्यालयातील अधीक्षक विजयकुमार पिराजी चिंचाळकर यांना अपिलात पूर्णपणे निर्दोष मुक्त केले आहे.

गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा येथील राजाराम गदाडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे शाखेने हा खटला दाखल केला होता. त्यात रत्नागिरी येथील विशेष न्यायालयाने चिंचाळकर यांना दोषी ठरवून पाच वर्षांच्या सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड अशी शिक्षा आॅक्टोबर २०१६मध्ये ठोठावली होती. त्याविरुद्ध चिंचाळकर यांनी केलेले अपील मंजूर करून न्या. ए.एम. बदर यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली.

फिर्यादी गदाडे सन १९७३ पासून पाचेरी सडा येथील त्यांच्या राहत्या घरातून देशी दारुचे दुकान चालवायचे. या दुकानाचा परवाना ते सन १९८९ पर्यंत नियमितपणे नूतनीकरण करून घेत होते. पुढे १० वर्षे त्यांनी नूतनीकरण केले नाही. नंतर त्यांनी नूतनीकरणासाठी अर्ज केला. प्रशासकीय पातळीवर राज्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण गेले व सन २०१२ पर्यंतचे सर्व परवाना शुल्क वसूल करून त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याचा आदेश सरकारकडून झाला. असे असूनही अधीक्षक चिंचाळकर यांनी नूतनीकरण करण्यास बरेच दिवस टाळाटाळ केली व अखेर या कामासाठी १० लाख रुपयांची मागणी केली.

अभियोग पक्षानुसार याच लाचेचा पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता १४ आॅगस्ट २०१३ रोजी त्यांच्या कार्यालयात स्वीकारताना ‘एसीबी’ने लाववेव्या सापळयात चिंचाळकर रंगेहाथ पकडले गेले. सर्व साक्षी-पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करून न्या. बदर यांनी म्हटले की, अशा प्रकरणात सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध केवळ लाच दिल्याचा पुरावा पुरेसा नाही. जे करण्यासाठी लाच मागावी असे फिर्यादीचे त्या अधिकाºयाकडे काही काम होते व त्यासाठी त्याने लाच मागितली, हेही सिद्ध व्हायला हवे. प्रस्तुत प्रकरणात चिंचाळकर यांनी गदाडे यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची टाळाटाळ केली व ते लवकर करण्यासाठी लाच मागितली हे असंभव वाटते. कारण ही फिर्याद करेपर्यंत गदाडे यांनी परवान्याच्या नूतनीकरणासाठी रीतसर अर्ज केला नव्हता किंवा त्यासाठीचे शुल्कही जमा केले नव्हते. त्यामुळे चिंचाळकर यांनी त्यासाठी टाळाटाळ करण्याचा किंवा लाच मागण्याचा प्रश्नच येत नाही.मित्राची भूमिका संशयास्पद

  • या सर्व प्रकरणात न्यायालयाने गदाडे यांचे मित्र राजेंद्र घोसाळकर यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला व घोसाळकर यांनीच हे सर्व घडवून आणले असावे, असा कयास नोंदविला. याची काही प्रमुख कारणे अशी
  • घोसाळकर मुळचे ठाण्याचे आहेत व त्यांचे तेथे वजन आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या या प्रकरणाची पिर्याद ठाण्यात नोंदविली गेली.
  • ठाण्याला जाण्यासाठी घोसाळकर यांनीच गदाडे यांना मोटार दिली व सोबत आपल्या मेव्हण्यासही पाठविले. सापळा रचण्यासाठी लाच म्हणून द्यायची संपूर्ण रक्कमही घोसाळकर यांनीच दिली.
  • धाड टाकण्यासाठी गेलेले ‘एसीबी’चे पथक ठाण्याहून थेट रत्नागिरीला न जाता हमरस्त्यापासून ४५ किमी आत असलेल्या घोसाळकर यांच्या फार्महाऊसवर गेले. तेथे घोसाळकर यांनी सर्वांची रात्रभर सरबराई केली व तेथेच सर्वांनी मिळून सापळा कसा रचायचा याची आखणी केली.
  • रत्नागिरीला गेल्यावर धाड पथकातील मंडळी ज्या हॉटेलमध्ये राहिली त्याचे भाडेही घोसाळकर यांनीच दिले.
टॅग्स :उच्च न्यायालय