मद्यधुंद तरुणीची वाहनांना धडक
By admin | Published: July 2, 2015 03:40 AM2015-07-02T03:40:28+5:302015-07-02T03:40:28+5:30
महिन्याभरापूर्वी दारुच्या नशेत गाडी चालवून जान्हवी गडकर या महिलेने टॅक्सीला धडक दिली होती. त्याच प्रकारे सोमवारी मध्यरात्री एका मद्यधुंद तरुणीने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना खार येथे घडली.
मुंबई : महिन्याभरापूर्वी दारुच्या नशेत गाडी चालवून जान्हवी गडकर या महिलेने टॅक्सीला धडक दिली होती. त्याच प्रकारे सोमवारी मध्यरात्री एका मद्यधुंद तरुणीने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना खार येथे घडली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.
निधी पारेख (२५) असे या आरोपी तरुणीचे नाव असून ती विलेपार्ले परिसरात राहणारी आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ती दारूच्या नशेत कारमधून घरी परतत असताना कार्टर रोड परिसरात सायकलवरुन चहा विक्री करणाऱ्या विजय सहानीला धडक दिली. त्यानंतर तिने तीन-चार वाहनांना धडक दिली. सहानीने ही महिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर खार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निधीला बाहेर येण्यास सांगितले. तिने स्वत:ला गाडीतच कोंडून ठेवले होते. बराच वेळ ती गाडीचा दरवाजा आणि खिडकी देखील उघडत नसल्याने पोलिसांनी गाडी मॅकनिकला घटनास्थळी बोलावले. मात्र ती त्याला देखील विरोध करत होती. तासभर हा ड्रामा झाल्यानंतर अखेर पोलिसांनी तिला बाहेर काढले. त्यानंतर तिचा नाव पत्ता घेऊन पोलिसांनी तिला घरी जाण्यास सांगितले. महिलांना रात्री अटक करता येत नसल्याने पोलिसांनी तिला मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ५ हजाराच्या जामिनावर पोलिसांनी तिची सुटका केली (प्रतिनिधी)