'19 फेब्रुवारी 'ड्राय डे' घोषित करा, शिवछत्रपतींचे आशीर्वाद मिळतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 02:38 PM2018-10-16T14:38:56+5:302018-10-16T19:38:37+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारी या जन्मदिनी राज्यात ड्राय डे घोषित करा, अशी मागणी राणेंनी केली आहे. दारू घरपोच पोहचविण्याऐवजी येणाऱ्या शिवजयंतीपासून 19 फेब्रुवारी हा ड्राय डे घोषित करा
मुंबई - राज्यात शिवजयंती दिनी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दारू घरपोच मिळणार, अशा बातम्या माध्यमात आल्या होत्या. त्यानंतर, सरकारविरुद्ध चांगलाच सूर आवळण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी चंद्रकांत बावनकुळे यांना लक्ष्य करत राज्यात शिवजयंती दिनी ड्राय डे घोषित करा, अशी मागणी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारी या जन्मदिनी राज्यात ड्राय डे घोषित करा, अशी मागणी राणेंनी केली आहे. दारू घरपोच पोहचविण्याऐवजी येणाऱ्या शिवजयंतीपासून 19 फेब्रुवारी हा ड्राय डे घोषित करा, शिवछत्रपतींचे आशीर्वाद नक्कीच भेटतील बावनकुळेसाहेब!! असे ट्विट राणे यांनी केलं आहे. बार्शी तालुक्यातील जय शिवराय प्रतिष्ठानकडून गेल्या 4 वर्षांपासून शिवजयंतीदिनी ड्राय डे घोषित करण्याची मागणी होत आहे. यासाठी जय शिवराय प्रतिष्ठानकडून नितेश राणेंना पत्रही देण्यात आले होते. तसेच हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडावा आणि मंजूर करुन घ्यावा, असेही प्रतिष्ठानने आपल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान, उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना, अपघात टाळण्यासाठी दारू घरपोच पोहचविण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, राज्य सरकार आणि बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठली. त्याच, पार्श्वभूमीर नितेश राणेंनी शिवजयंती हा दिवस ड्राय डे साजरा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दारु घरपोच देण्याचा निर्णय होणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.