लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : कोरडा आहार बंद करावा, तसेच अंगणवाडी आहार पुरवठादार महिला बचत गटांच्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १९ जानेवारीपासून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सिटूच्या राज्य सचिव शुभा शमीम म्हणाल्या की, महिला व बाल विकास विभागाने १५ मार्च, २०२० पासून आजपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडीतील लहान बालकांना ताजा शिजलेला पूरक पोषण आहार देण्याचे काम बंद ठेवून, कोरडे धान्य देणे सुरू केले. हे काम पूर्ण महाराष्ट्रातील बचत गटांना डावलून, महाराष्ट्र ग्राहक सहकार फेडरेशनला देण्यात आले. आता महाराष्ट्र शासनाने आर्थिक उलाढालीला चालना देण्यासाठी सर्व उद्योगधंदे पूर्ववत सुरू केले, पण बचत गटांचे काम अजूनही बंद असून, महाराष्ट्रातील हजारो काम करणाऱ्या महिलांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.