सणासुदीच्या दिवसांत सुक्या मेव्याची बाजारात रेलचेल! खजुराला सर्वांत जास्त मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 03:10 AM2017-09-27T03:10:37+5:302017-09-27T03:10:43+5:30

सध्या सर्वत्र दसरा, दिवाळीनिमित्त खरेदीची धूम आहे. मिठाई आणि चॉकलेटसह आरोग्यदायी सुक्या मेव्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मशीद बंदर येथे सुक्या मेव्याचे घाऊक व्यापारी मोठ्या संख्येने आहेत.

Dry dried fruits in the festive season! The highest demand for Khajuraho | सणासुदीच्या दिवसांत सुक्या मेव्याची बाजारात रेलचेल! खजुराला सर्वांत जास्त मागणी

सणासुदीच्या दिवसांत सुक्या मेव्याची बाजारात रेलचेल! खजुराला सर्वांत जास्त मागणी

Next

मुंबई : सध्या सर्वत्र दसरा, दिवाळीनिमित्त खरेदीची धूम आहे. मिठाई आणि चॉकलेटसह आरोग्यदायी सुक्या मेव्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मशीद बंदर येथे सुक्या मेव्याचे घाऊक व्यापारी मोठ्या संख्येने आहेत. मागील दोन आठवड्यांपासून घाऊक बाजारात सुक्या मेव्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. किरकोळ बाजारातही मागील दोन-तीन दिवसांपासून तेजी असल्याचे व्यापा-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सुक्या मेव्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खजूर, खारिक आणि मनुक्यांना जास्त मागणी आहे. यंदा सुक्या मेव्याच्या किमतीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु त्याचा ग्राहकांवर फारसा फरक पडला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. किरकोळ बाजारात खजुराला सर्वांत जास्त मागणी असल्याचे मशीद बंदर येथील सुक्या मेव्याचे व्यापारी आरिफ शेख यांनी सांगितले. खजुर प्रतिकिलो २०० रुपयांपासून ते थेट २ हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारांमध्ये उपलब्ध असल्याने सर्व प्रकारचे ग्राहक खजुराला पसंती देतात, असेही शेख यांनी सांगितले.
दसरा, दिवाळीनिमित्त गिफ्ट देण्यासाठी काजू किंवा बदामांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे घाऊक बाजारामध्ये काजू, बदामालाही मोठी मागणी आहे. बदाम प्रतिकिलो ८०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर काजू प्रतिकिलो ९५० रुपये ते १५०० रुपये किलोच्या किमतींत उपलब्ध आहेत. काजू, बदामाच्या तुलनेत पिस्त्याला कमी मागणी आहे. पिस्ता हा काजू, बदामपेक्षाही अधिक महाग आहे. पिस्ता ११०० ते १४०० रुपयांच्या दरात उपलब्ध आहे, असे विक्रेते सलमान खान यांनी सांगितले. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांनी पिस्ता खरेदीकडे पाठ फिरवली आहे. खारिक, अक्रोड आणि मणुकेही अनेकांची पसंती मिळवत आहेत. खारिक २५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत तर मनुके २०० ते ४०० रुपयांच्या दरामध्ये उलब्ध आहेत.

सणांमुळे व्यवसायाला वेग
गेल्या काही दिवसांपासून बाजार थंडावलेला होता, मात्र नवरात्रौत्सव सुरू झाल्यानंतर ग्राहकांची संख्या वाढू लागली आहे. मागील दोन दिवसांपासून चांगला व्यवसाय होऊ लागला आहे. काजू, बदाम आणि खजुराला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे.
- मोहम्मद सिद्दिकी, विक्रेता.

बदाम प्रतिकिलो ८०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत
काजू प्रतिकिलो ९५० रुपये ते १५०० रुपयांपर्यंत
पिस्ता प्रतिकिलो ११०० ते १४०० रुपयांपर्यंत
खारिक प्रतिकिलो २५० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत
मनुके प्रतिकिलो २०० ते ४०० रुपयांपर्यंत

Web Title: Dry dried fruits in the festive season! The highest demand for Khajuraho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.