Join us

सुका मेव्याच्या बाजारपेठेलाही मंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:19 AM

मोठ्या कॉर्पोरेट ग्राहकांनी फिरवली पाठ; विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण

मुंबई : दिवाळीनिमित्त घरोघरी तयार केल्या जाणाऱ्या फराळामध्ये तसेच बाजारातील मिठाईमध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, पिस्ता, किसमिस आणि खारीक यांचा वापर केला जातो. अनेक जण सुका मेवा हा आप्तेष्टांना भेट म्हणून देतात. यंदा सुका मेवा खरेदीच्या बाजारपेठेलाही आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. मोठ्या कॉर्पोरेट ग्राहकांनी या बाजारपेठेकडे पाठ फिरविल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा सुक्या मेव्याची पाकिटे भेट देण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. जीएसटी कर लागल्यानंतर मागील दोन वर्षांत सुक्या मेव्याचे दर वाढले होते. यंदा तर आर्थिक मंदीमुळे सुका मेवा विक्रेत्यांना चांगलाच फटका बसला असून यामुळे उलाढाल कमी होणार असल्याचे विक्रेते नारायण सोनटक्के यांनी सांगितले.

दिवाळीच्या हंगामात क्रॉफर्ड मार्केट आणि मशीद बंदर येथील घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांसह ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी उसळते. यंदा हे चित्र अद्याप दिसत नाही. या काळात आम्हाला एकमेकांशी बोलण्याचीही फुरसत नसते. यंदा मात्र मागणी नसल्याने निवांत बसण्याखेरीज पर्याय नाही, असे क्रॉफर्ड मार्केट येथील सुक्या मेव्याचे व्यापारी कौशिक शहा यांनी सांगितले.

सुक्या मेव्याची किंमत ही त्यांचा आकार आणि गुणवत्तेनुसार वेगवेगळी आहे. सुक्या मेव्यातील बदाम, पिस्ता आणि खारीक या पदार्थांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बदामाची विक्री घाऊक बाजारात प्रति किलो ७०० रुपयांनी आणि किरकोळ बाजारात ९०० रुपयांनी आहे. पिस्त्याची विक्री जून महिन्याच्या अखेरीस घाऊक बाजारात प्रति किलो १५०० रुपयांनी आणि किरकोळ बाजारात १७०० रुपयांनी होत होती. यामध्ये वाढ झाली असून पिस्त्याची विक्री घाऊक बाजारात प्रति किलो १६०० रुपयांनी आणि किरकोळ बाजारात १८०० रुपयांनी होत आहे. खारकेची विक्री घाऊक बाजारात १८० रुपयांनी आणि किरकोळ बाजारात २०० रुपयांनी होत होती. उत्तम प्रतिचा खारीक घाऊक बाजारात २५० रुपयांनी आणि किरकोळ बाजारात ४०० रुपयांनी मिळत आहे.

टॅग्स :दिवाळीअर्थव्यवस्था