सर्वत्र सुखाचा वर्षाव!

By admin | Published: July 16, 2017 04:22 AM2017-07-16T04:22:38+5:302017-07-16T04:22:38+5:30

रुसून पळून गेलेला पाऊस परतल्याने ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’ असे चैतन्यमय चित्र राज्यभरात पहायला मिळत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवसाच्या

Dry rain everywhere! | सर्वत्र सुखाचा वर्षाव!

सर्वत्र सुखाचा वर्षाव!

Next

पुणे/मुंबई : रुसून पळून गेलेला पाऊस परतल्याने ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे’ असे चैतन्यमय चित्र राज्यभरात पहायला मिळत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवसाच्या सुखवर्षावाने मऱ्हाटी मुलूख चिंब झाला आहे. मुबईत जोरदार वृष्टी सुरूच आहे. विदर्भातही पाऊसधारा सुरू झाल्या असून गडचिरोलीत अतिवृष्टी झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात सरींवर सरी पडत आहेत. खान्देशसह उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार कायम आहे. मध्य, उत्तर महाराष्ट्रातील काही धरणे भरल्याने विसर्ग सुरू झाला आहे. मराठवाड्यात पाऊस नसला तरी जायकवाडीतील नाथसागरात पाणीसाठा होऊ लागला आहे.
मुंबई शहरासह उपनगरातशनिवारी सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. मुंबईकरांची तहान भागविणारा मोडक सागर तलाव भरुन वाहू लागला आहे. माळशेज घाटात दरडी कोसळत असल्याने पुढील दोन दिवस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे.

राधानगरी फुल्ल, पंचगंगा फुगली... 
पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून राधानगरीसह पाच धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटांपर्यंत गेली असून, आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात चांदोली धरण परिसरात संततधार सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. कोकणात मात्र पावसाचा जोर किंचित कमी झाला आहे.

आजही मुसळधार... : भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. १७ आणि १८ जुलै रोजीही सर्वदूर मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

पाण्याचे टेन्शन मिटणार... 
मुंबई : तलाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तलावाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी ६.३२ वाजता भरून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. अन्य तलावांतही पाण्याची पातळी वाढत असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटणार आहे.

माळशेज घाट दोन दिवस बंद...
गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात दरडी कोसळत आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस येथील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवरही बंदी घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Dry rain everywhere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.