Join us

राज्यात आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:14 AM

राज्यात आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन३० जिल्हे, २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मोहीमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ३० ...

राज्यात आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

३० जिल्हे, २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज, शुक्रवारी कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यापुर्वी २ जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या चार जिल्ह्यांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज लसीकरणाची ड्राय रन घेतली जाणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून जिल्ह्यांचे, तर जिल्हास्तरावरून आरोग्य संस्था आणि लसीकरण पथकांचे यूजर आयडी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन ॲपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप व शीतसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी १ ते ४ आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे, आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोविन ॲपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना कोरोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चौकट

यासाठी केले जाते ड्राय रनचे आयोजन

क्षेत्रिय स्तरावर कोविन ॲपची उपयोगिता तपासणे, कोरोना लसीकरणाबाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्राय रन घेतला जातो.