कासा : डहाणू तालुक्यात भातरोपणीच्या कामास शेतकऱ्यांनी पावसाअभावी संथ गतीने सुरुवात केली आहे. पाऊस कमी असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळव्या भात रोपण्या रखडल्या होत्या. मात्र कालपासून पुन्हा पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी हळवी भातरोपणी सुरु केली आहे. मात्र पावसाचा अनियमतापणामुळे भात रोपे करपली तर काही ठिकाणी न उगवल्याने भात रोपे अपुरी पडत असल्याने यंदा बऱ्याच शेतकऱ्यांची भातशेती ओस जाणार आहे, असे शेतकरी विनायक पाटील यांनी सांगितले.तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. भाताबरोबरच सायवन, कासा भागात उताराच्या माळरानावर व डोंगराळ भागात नाचणी , उडीद खुरासणी आदी पीकेही मोठ्याप्रमाणात पावसाळ्यात घेतली जातात. कालपासून पावसाने पुन्हा जोरात सुरुवात केली असली तरी मागील कालावधीत पाऊसच खूप कमी असल्याने सदर पिकांच्या लागवडी खोळंबल्या आहेत. तसेच माळरानावरील व कोरड्या जमिनीवर हळवी भातशेती केली जाते. परंतु पाऊसच कमी असल्याने सदर जमिनीवर चिखलणी होत नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या रोपण्या रखडल्या आहेत. पावसाअभावी भात रोपांची वाढ न झाल्याने तसेच काही ठिकाणी करपल्याने रोपणीसाठी भात रोप अपुरे पडत आहेत.
डहाणूत हळव्या भात रोपण्या संथ गतीने सुरु
By admin | Published: July 17, 2014 1:34 AM