Join us

पर्यटनस्थळांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी वीकेंडला घरातच वेळ घालवला. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी वीकेंडला घरातच वेळ घालवला. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, वरळी सी-फेस, जुहू चौपाटीसह शहरातील अन्य पर्यटनस्थळांवर शुकशुकाट दिसून आला.

गेटवेवरून एलिफंटा आणि अलिबाग, त्याचप्रमाणे भाऊच्या धक्क्यावरून मोरा-रेवसला जलपर्यटनासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या प्रतिदिन १० हजार इतकी आहे. वीकेंड लॉकडाऊनमुळे बहुतांश आस्थापने बंद असल्याने येथे पर्यटकांनी धाव घेतल्यास कठोर निर्बंधांचा फज्जा उडू शकतो, या भीतीने जलवाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पर्यटक आल्यास त्यांना गेटवेच्या बाहेरूनच परत पाठविण्यासाठी पोलिसांचे पथकही तैनात करण्यात आले होते.

मरिन लाइन्स, जुहू चौपाटी, वरळी सी-फेस या ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने पर्यटक फिरकले नाहीत. मोठ्या उद्यानांचे दरवाजे बंद करून पर्यटक आत येणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली होती. शिवडी, वरळी किल्ल्यांसह अन्य ऐतिहासिक स्थळांजवळ गस्त वाढविण्यात आल्याने तेथेही शुकशुकाट दिसून आला.

* वानखेडे मैदनावर विशेष खबरदारी

शनिवारी वानखेडे मैदानावर आयपीएलचा सामना होणार असल्याने क्रिकेटप्रेमींची गर्दी जमण्याच्या संभाव्य शक्यतेमुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली. हा सामना प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार असला तरी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूचे गेटजवळ दर्शन होईल या आशेपोटी चाहते जमल्यास त्यांची गर्दी पांगवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे क्रिकेट रसिक येथे फिरकले नाहीत.

-------------------