DSK प्रकल्प मार्गी लागणार, पुण्यात ९ वर्षे रखडलेल्या १६१ घर खरेदीदारांना दिलासा
By सचिन लुंगसे | Published: December 31, 2022 11:45 AM2022-12-31T11:45:50+5:302022-12-31T11:47:10+5:30
महारेराने नियुक्त केलेल्या नरेडको आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या समेटकर्त्यांमुळे रखडलेला हा प्रकल्प मार्गी
मुंबई : काही अडचणींमुळे २०१३ पासून रखडलेला तळेगाव दाभाडे, पुणे येथील डी एस के सदाफुली हा प्रकल्प आता मार्गी लागला आहे. महारेराने हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी नरेडको आणि मुंबई ग्राहक पंचायत यांच्या अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्यांवर समेट घडवून आणण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी या प्रकल्पाशी संबंधित सर्व घटकांना एकत्र आणले. मूळ प्रकल्पाचे पतपुरवठादार, नवीन विकासक , या प्रकल्पातील घर खरेदीदारांची सदाफुली सहकारी गृहनिर्माण संस्था यांनीही सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका घेतली. या सर्वांच्या सक्रिय सहकार्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असून लवकरच 161 जणांना हक्काचे घर मिळणार आहे.
डीएसके यांच्या पुण्यातील डीएसके सदाफुली या प्रकल्पाबाबत घर खरेदीदारांच्या सदाफुली सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे अनेक तक्रारी महारेराकडे आल्या होत्या. महारेरा अध्यक्षांनी त्या अनुषंगाने वेळोवेळी सुनावण्या घेऊन हा प्रकल्प मार्गी लागावा , यासाठी अगोदर या प्रकल्पाची नोंदणी रद्द केली. त्यानंतर महारेराच्या कलम ७ आणि ८ च्या अनुषंगाने हा प्रकल्प नवीन विकासकाला पूर्ण करण्यासाठी देण्यात यावा, असा निर्णय दिला. शिवाय प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी नरेडको आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या अनुभवी आणि ज्येष्ठ सदस्य्यांची नियुक्ती महारेराने केली .
या समेटकर्त्यांच्या मध्यस्थीमुळे या प्रकल्पाचे मूळ पतपुरवठादार, नवीन विकासक आणि घर खरेदीदारांची सदाफुली सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यातील समन्वयाने आणि सामंजस्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली. डीएसके सदाफुली हा प्रकल्प पूर्वी डी एस कुलकर्णी या विकासकाच्या नावाने ओळखला जात होता. नवीन विकासकाने या प्रकल्पाला पलाश सदाफुली असे नाव दिले असून महारेराने नवीन विकासकाला या नवीन नावाने नोंदणीपत्र जारी केले आहे. या सर्वांमुळे हा प्रकल्प पूर्णत्त्वाच्या मार्गावर असून या प्रकल्पातील 161 घर खरेदीदारांचे स्वतःच्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे.