मुंबई/पुणे : गुंतवणूकदारांची २३० कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी काढून घेतल्याने पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. पुणे पोलिसांनी त्यासाठी चार पथके रवाना देखील केली आहेत.डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. डीएसकेंनी ते मान्यही केले. हे पैसे भरण्यासाठी उच्च न्यायालयाने डीएसकेंना अनेकदा मुदतवाढही दिली. तरीही काहीना काही बहाणा करून डीएसके वेळ मारुन नेत होते. डीएसकेंनी न्यायालयाला गृहित धरले. त्यांनी गुंतवणूकदारांसह न्यायालयाची फसवणूक व विश्वासघात केला. त्यांना अटकेपासून संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे न्या. साधना जाधव यांनी संतप्त होत म्हटले.गुंतवणूकदारांचा माझ्यावर विश्वास आहे, हे बाहेर तुम्ही कोणत्या तोंडाने सांगता? न्यायालयाचाही तुमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला न्यायालयात बोलावले, तेव्हाच अटकेचा आदेश दिला असता. मात्र, गुंतवणूकदारांचे हित साधण्यासाठी मी पैसे भरण्यासाठी संधी दिली. मात्र, तुम्ही केवळ बनाव करून वेळकाढूपणा करत आहात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने डीएसकेंना फटकारले.- बुलडाणा अर्बन पतपेढी १०० कोटींचे कर्ज देणार असल्याचे डीएसकेंनी सांगितले होते. मात्र, ते ज्या जमिनी बँकेला विकून पैसा उभा करणार होते, त्या याआधीच बँक आॅफ महाराष्ट्रकडे तारण ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुणे ईओडब्ल्यूने १५ फेब्रुवारी रोजी न्या. जाधव यांना २२ फेब्रुवारीची सुनावणी शुक्रवारी घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती.पुणे पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक आयुक्त नीलेश मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. डीएसके यांच्या अटकेसाठी पथके रवाना केली असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.- पंकज डहाणे,पोलीस उपायुक्त-पुणे शहर
डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होणार, न्यायालयात बनाव उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:58 AM