डीएसओ राज्य युवा प्रशिक्षण शिबिर उत्साहात
By admin | Published: March 9, 2017 03:33 AM2017-03-09T03:33:46+5:302017-03-09T03:33:46+5:30
धारावी येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात शासनाचे युवा प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. राज्यातील युवांचे सक्षमीकरण करण्यासह व्यवसाय मागदर्शन
मुंबई : धारावी येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात शासनाचे युवा प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. राज्यातील युवांचे सक्षमीकरण करण्यासह व्यवसाय मागदर्शन आणि युवकांची असलेली कर्तव्ये व अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धारावी येथील राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलात निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी क्रीडामंत्र्यांचे स्वीय्य सहायक श्रीपाद ढेकणे, क्रीडा विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकारी कविता नावंदे, मुंबई क्रीडा उपसंचालक एन.बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के हे उपस्थित होते. शिबिरात १५० युवकांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र सायबर व महिला अत्याचार विभागाच्या पोलीस उप-अधीक्षक रक्षा महाराव यांनी शिबिरात पोलीस व कायदा सुव्यवस्था विषयांवर युवकांना मार्गदर्शन केले. तर ग्राहक संरक्षण कायद्याविषयी कायदा अभ्यासक अॅड. देविका पुरव यांनी युवकांच्या शंकांचे निरसन केले. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते
सुभाष दळवी यांनी ‘आजचा
युवक आणि त्याची सामाजिक बांधिलकी’ या विषयावर युवांशी संवाद साधला.
‘लैंगिक शिक्षणा’पासून ते ‘सुदृढ आरोग्या’पर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळीनी युवांना मार्गदर्शन केले. शिबिरार्थींना फाईल, फोल्डर, नोटपॅड आणि किट देण्यात आले. सर्व शिबिरार्थींची निवास आणि भोजन व्यवस्था शासनाच्या वतीने क्रीडा संकुलात करण्यात आली होती. क्रीडा अधिकारी सुभाष नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ स्वयंसेवकांच्या साथीने शिबिर उत्साहात पार पडले. (क्रीडा प्रतिनिधी)
रिदमिक जिम्नॅस्टसह नृत्याचा नजराणा
- शिबिराच्या शेवटच्या दिवशी रिदमिक जिम्नॅस्टसह नृत्यांच्या दर्जेदार सादरीकरणामुळे युवकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.
- वर्षा उपाध्ये यांनी रिदमिक जिम्नॅस्टीकचे शिस्तबद्ध सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. तर समूह नृत्यानेदेखील उपस्थितांची मने जिंकली. या वेळी युवांनीदेखील ऐरोबिक्स प्रकारात सहभाग घेतला.