Join us

डीएसआरव्ही १ नौदलाच्या ताफ्यात; पाणबुडीत अडकलेल्यांची सुटका शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 5:56 AM

खोल समुद्रात पाणबुडीत अडकलेल्या नौसैनिकांना सुखरूप पाण्याबाहेर काढू शकणारे डीएसआरव्ही हे वाहन बुधवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

मुंबई : खोल समुद्रात पाणबुडीत अडकलेल्या नौसैनिकांना सुखरूप पाण्याबाहेर काढू शकणारे डीएसआरव्ही हे वाहन बुधवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. डीएसआरव्ही प्रणालीमुळे अपघातग्रस्त पाणबुडी शोधणे, अशा पाणबुडीपर्यंत पोहोचणे आणि त्यात अडकलेल्या नौसैनिकांची सुटका करणे शक्य होणार आहे.येथील नौदल गोदीत बुधवारी आयोजित कार्यक्रमात डीएसआरव्ही या वाहनाचा नौदलात समावेश करण्यात आला. या वेळी नौदल प्रमुख सुनील लांबा, नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अपघात अथवा अन्य काही कारणांमुळे खोल समुद्रातून पाणबुडी बाहेर काढता येणार नसेल अशावेळी डीएसआरव्ही वाहनाच्या मदतीने पाणबुडीतील नौसैनिकांची सुटका करता येणार आहे. भारतीय नौदलात पहिल्यांदाच अशा प्रकारचे वाहन दाखल झाल्याचे सांगून अ‍ॅडमिरल सुनील लांबा म्हणाले की, डीएसआरव्हीच्या साहाय्याने एकावेळी १४ जणांची सुटका करणे शक्य होणार आहे. समुद्रात तब्बल ६५० मीटर खोलपर्यंत उतरण्याची या वाहनाची क्षमता आहे. एप्रिल २०१९ अखेरपर्यंत आणखी एक डीएसआरव्ही वाहन नौदलात दाखल होईल. नौदलाच्या विशाखापट्टणम् तळावर हे दुसरे वाहन ठेवण्यात येणार असल्याचेही लांबा यांनी स्पष्ट केले.पाणबुडीत अडकलेल्या जवानांच्या सुटकेसाठीच्या प्रणालीची आवश्यकता चार दशकांपूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. आज डीएसआरव्ही भारतात आल्यामुळे अशा प्रकारची सुविधा असणाऱ्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश झाल्याचे नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले. डीएसआरव्ही वाहनांसाठी २०१६ साली भारतीय नौदलाने ब्रिटनच्या मेसर्स जेम्स् फिशर डिफेंन्स या कंपनीशी दोन हजार कोटींचा करार केला केला होता. वाहतुकीच्या दृष्टीने डीएसआरव्हीची बांधणी सोयीस्कर आहे. अगदी एखाद्या विमानातूनही याची वाहतूक शक्य आहे. त्यामुळे भारतीय सागरात अथवा अन्य ठिकाणी तातडीने डीएसआरव्ही वाहन घटनास्थळी रवाना करता येणार आहे. 

टॅग्स :भारतीय नौदल