मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे आवडीच्या वाहिन्यांची यादी देण्यावरून ग्राहक व डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. ग्राहकांना कोणत्या वाहिन्या पाहायच्या याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ट्रायच्या या निर्णयामुळे मिळाल्याचा दावा केला जात असताना व हेच या निर्णयाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य असताना विविध डीटीएच कंपन्या त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांचे समूह (बुके) विक्री करण्याचा निर्णय लादू लागल्याने ग्राहक व डीटीएच कंपन्यांमध्ये वाद होत आहेत.ट्रायच्या निर्णयाप्रमाणे आवडीच्या वाहिन्या निवडण्यासाठी डीटीएच सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी आपापल्या डीटीएच कंपनीशी संपर्क साधला होता. मात्र त्यापैकी काही ठिकाणी डीटीएच कंपन्यांकडून त्यांनी सुचवलेल्या वाहिन्यांचे बुके स्वीकारण्याची सक्ती केली जात असल्याचे चित्र आहे.कल्याणमधील काही सजग ग्राहकांनी ट्रायचे नियम लागू होण्यापूर्वीच २२ जानेवारीला याबाबत व्हिडीओकॉन डीटीएच कंपनीच्या कॉलसेंटरवर संपर्क साधून त्यांच्या आवडीच्या वाहिन्यांची यादी सांगितली. त्यावर सध्याच्या दरापेक्षा १०० रुपये अधिक द्यावे लागतील असे सांगण्यात आले. त्याला ग्राहकांनी होकार दिला होता. मात्र १ फेब्रुवारीला ट्रायच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा प्रत्यक्षात या ग्राहकांच्या पॅकेजमधून सशुल्क वाहिन्यांचे प्रसारण थांबविण्यात आले व पॅकेज अद्ययावतीकरण करण्यासाठी काही काळ केवळ फ्री टु एअर वाहिन्याच दिसतील असे सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये डीटीएच सेवा पुरवठादार कंपन्यांबाबत संताप आहे. कंपनीतर्फे ग्राहकांना बुकेची सविस्तर माहिती मिळत नाही. ग्राहकांना दिलेल्या बुकेमध्ये अनावश्यक वाहिन्यांचा भडिमार केला जात असून, परस्पर इतर बुके ग्राहकांवर लादण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष आहे.मराठी भाषिक ग्राहकांना मराठी व हिंदीव्यतिरिक्त ग्राहकांची इच्छा नसताना इतर भाषिक वाहिन्यांचा बुकेमध्ये समावेश करून या वाहिन्यांसाठी शुल्क आकारले जात आहे. हा प्रकार ट्रायच्या निर्देशांविरोधी असल्याचा आक्षेप ग्राहकांनी नोंदवला आहे.३५० रुपयांच्या पॅकेजसाठी द्यावे लागतात ४५० रुपयेकाही ब्रॉडकास्टर्सनी त्यांच्या बुकेमध्ये उत्तर प्रदेशमधील वाहिन्यांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ३५० रुपयांत मिळणाºया पॅकेजऐवजी या ग्राहकांना आता ४५० रुपये भरावे लागत आहेत. डीटीएच कंपन्यांकडून होणाºया या मनमानीपणाचा ग्राहकांनी निषेध केला आहे. तर, याबाबत व्हिडीओकॉन डीटीएच प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.कमी टीआरपी असलेल्या वाहिन्यांचे भविष्य धोक्यातमुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या (ट्राय) नियमावलीची अंंमलबजावणी सुरू झाल्याने ग्राहकांच्या खिशाला त्याची झळ बसू लागली आहे. बहुसंख्य ग्राहकांच्या केबल व डीटीएच सेवेसाठी पूर्वीपेक्षा अधिक शुल्क भरावे लागत असल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी, वाहिन्यांची निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना देण्यात आल्याने ज्या वाहिन्यांचा टीआरपी चांगला आहे त्यांची निवड सर्वाधिक ग्राहक करीत आहेत. परंतु ज्यांचा टीआरपी कमी आहे त्यांची निवड करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे कालांतराने कमी टीआरपी असलेल्या वाहिन्यांचे भविष्य धोक्यात येण्याची भीती असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे ट्रायच्या निर्णयामुळे वाहिन्यांवरील कार्यक्रमांच्या दर्जामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अन्यथा अशा वाहिन्या या स्पर्धेत टिकू शकणार नाहीत.
डीटीएच ग्राहकांत संताप; समूह वाहिन्या जबरदस्ती लादत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 6:49 AM