मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवीचे शिक्षण, फ्रान्सच्या ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार

By रेश्मा शिवडेकर | Published: January 6, 2024 06:01 PM2024-01-06T18:01:31+5:302024-01-06T18:04:40+5:30

विद्यापीठाच्या नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी विभागाने फ्रान्समधील प्रतिष्ठित ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. 

Dual Degree Education at University of Mumbai, Academic MoU with University of Troyes, France | मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवीचे शिक्षण, फ्रान्सच्या ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार

मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवीचे शिक्षण, फ्रान्सच्या ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार

मुंबई - फ्रान्सच्या ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार करत नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी विषयात दुहेरी पदवी शिक्षण घेण्याची संधी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यापीठाच्या नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी विभागाने फ्रान्समधील प्रतिष्ठित ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी फेलोशिपवर ट्रॉयस विद्यापीठात शिकता येईल. तसेच विद्यापीठातील तज्ज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळेल. दुहेरी पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे.

प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागेल, अशी अपेक्षा कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या पदव्युत्तर एम.एस्सी दुहेरी पदवी अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून पीएच.डी.साठीही सामायिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे विभागाचे संचालक प्रा. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थी-शिक्षकांना फायदा काय

- विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळवण्याची संधी

- नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी विषयातील विविध संशोधन पद्धती आणि उपकरणांचा विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल.

- प्राध्यापक विनिमयाअंतर्गत संशोधकांना संयुक्त आणि सहयोगी प्रकल्पांवर एकत्रित काम करण्याची संधी मिळेल.

- संशोधन सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापर शक्य होईल.

- संशोधन प्रकाशने आणि संयुक्त प्रकाशनावर काम करण्याची संधी मिळेल.

- सांस्कृतिक आणि भाषा कौशल्ये वृद्धीस मदत

- भारत आणि युरोपियन देशातील संशोधनाच्या प्राधान्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील जागतिक समज विस्तृत करण्यास मदत

- जागतिक स्तरावरील प्रख्यात संस्थांमध्ये डॉक्टरेट आणि पोस्टडॉक्टरल संशोधनासारख्या प्रगत अभ्यास करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी

Web Title: Dual Degree Education at University of Mumbai, Academic MoU with University of Troyes, France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.