दुहेरी भाषांमुळे मुलांची चिकित्सक वृत्ती धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:56 AM2017-08-17T01:56:39+5:302017-08-17T01:56:44+5:30
लहान मुलांमध्ये उपजतच चिकित्सक वृत्ती अधिक असते.
पूजा दामले।
मुंबई : लहान मुलांमध्ये उपजतच चिकित्सक वृत्ती अधिक असते. पण, घरांमध्ये बोलली जाणारी भाषा आणि शाळेत बोलली जाणारी भाषा भिन्न असल्याने अनेक मुलांचा गोंधळ उडतो. त्यात शाळेच्या भाषेत विचार करण्याची सवय मेंदूला नसल्याने प्रश्न विचारण्याची क्षमता कमी होत जाते. त्यातून चिकित्सक वृत्ती धोक्यात येत असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी हा काळ कसोटीचा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
इंग्रजी माध्यमात शिकणाºया अनेक विद्यार्थ्यांचा हा भावनिक, वैचारिक गोंधळ झालेला पाहायला मिळतो. पण, पालक आणि अन्य व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याच्या नादात मुलांची खरंच प्रगती होते की नाही, याचाही सारासार विचार होत नसल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. अभ्यासाच्या ओझ्याखाली मुलांचे बालपण हरवत चालल्याची भीतीही तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
ज्ञानभाषा कोणती असावी? या विषयावर देश-विदेशांत मोठ्या प्रमाणात संशोधने सुरू आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना चांगले समजते, असाही निष्कर्ष अनेक संशोधनांतून पुढे आला आहे. पण, जगाची ज्ञानभाषा इंग्रजीच आहे. मुलांना इंग्रजी भाषा शिकवणे ही काळाची गरज आहे; ही संकल्पना मान्य करत पालक पाल्यांना इंग्रजी शाळेत घालतात. मुळात इंग्रजी भाषा शिकणे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणे यात पालक गफलत करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मराठी शाळांतील पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा भाव वधारत आहे.
इंग्रजी शाळांमध्ये शिशू वर्गातही पाल्याला प्रवेश घेण्यासाठी पालकांना हजारो रुपये शुल्क आणि अन्य पैसे भरावे लागतात. प्रत्येक वर्षी शुल्कात वाढ केली जाते. त्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. पण, माफक शुल्क आकारून शिक्षण देणाºया मराठी शाळांकडे मात्र पालक पाठ फिरवतात. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणे म्हणजे अनेकांना ‘स्टेट्स’चा प्रश्न वाटतो. तर, दुसरीकडे आजूबाजूच्या घरातील मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जातात. त्यामुळे मुलांना इंग्रजी माध्यमात घातले जाते. गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या हा कृतीचा फटका मराठी शाळांना बसला आहे. महापालिकेसह खासगी मराठी शाळांची अवस्था सध्या बिकट आहे. तर, काही ठिकाणी मराठी शाळा बंद पडल्या आहेत. तसेच मराठी माध्यमाच्या ठिकाणी अन्य माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या ८ ते १० वर्षांपासून विविध गट मराठी शाळा संवर्धनासाठी कार्यरत आहेत. मात्र, यामध्ये पालकांचा आणि अन्य व्यक्तींचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
>प्रयोगशील
मराठी शाळा
मुंबईसह राज्यात अनेक मराठी शाळांमध्ये शिक्षणासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग केले जातात. आनंद निकेतन, अक्षरनंदन, ग्राममंगल, महात्मा गांधी शाळा, डी. एस. हायस्कूल, गुरुकुल या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विविध प्रयोग राबविले जातात. पण, हे सर्व प्रयोग त्याच शाळांपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे सरकारने या शाळांतील प्रयोग अन्य शाळांमध्ये चालू करण्यासाठी सीएसआर तत्त्वावर मदत करणे आवश्यक असल्याचे मत मराठी अभ्यास केंद्राचे समन्वयक आनंद भंडारे यांनी व्यक्त केले.
>मुंबईत १२००
मराठी शाळा
मुंबईत महापालिका आणि खासगी मराठी माध्यमाच्या
१ हजार २०० शाळा आहेत. यामध्ये तब्बल ३ लाख ५६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती महापालिका शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी दिली.
>मानसिकता बदलण्याची गरज
गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांमधील हजेरी पटावरील संख्या कमी होण्यासाठी पालकांची मानसिकता मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पण, याकडे पालक दुर्लक्ष करून सरसकट इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी सध्या अनेक माध्यमे आहेत. तसेच, मराठी शाळांविषयी सरकार उदासीन आहे. सरकारची मानसिकता बदलल्यास नक्कीच त्याचा फायदा मराठी शाळांना होईल. मराठी शाळांना एकत्र जोडून त्यांच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी सरकारनेही सक्रिय होऊन मदतीचा हात दिला पाहिजे. सर्वच एकत्र येऊन काम करतील तेव्हाच मराठी शाळांचे संवर्धन होऊ शकते.
- आनंद भंडारे, समन्वयक, मराठी अभ्यास केंद्र
>३५ शाळा
बंद होण्याच्या मार्गावर
काही महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या मराठीसह अन्य भाषिक ३५ शाळा विद्यार्थ्यांच्या संख्येअभावी बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
>मराठी माध्यमाच्या शाळा चालवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. पण, पालिका ही जबाबदारी झटकत आहे. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी प्रथम भाषा शिकवणे ही धक्कादायक बाब आहे. कारण, आता ही प्रक्रिया मराठी शाळा इंग्रजीमध्ये परावर्तित करण्याची आहे. मातृभाषेत शिक्षण घेतलेले देश प्रगती करतात. उदा- चीन, जर्मनी आहेत. त्यामुळे हे आपण ओळखले पाहिजे.
- ज. मु. अभ्यंकर, माजी संचालक, राज्य प्रकल्प, सर्व शिक्षा अभियान
>मराठी शाळा चालवणाºया संस्था चालकांसमोर आता अनेक प्रश्न आहेत. सरकारच्या अनास्थेमुळे मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनुदानित शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठी शाळांतील शिक्षकांची पदे भरली जात नाहीत. शिक्षकेतर कर्मचाºयांच्या पदांना मंजुरी मिळत नाही. पालकही शाळांपासून दुरावले आहेत. त्यामुळे मराठी शाळा पालक आणि सरकारच्या कोंडीत अडकल्या आहेत.
- गिरीश सामंत, सचिव, अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल
>मराठी शाळांसमोरीस सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांची गळती. त्याचबरोबर मुंबईतून मराठी कुटुंबांचे स्थलांतर होत आहे. त्यामुळेही मराठी माध्यमांच्या शाळेतील संख्या कमी होत चालली आहे. इंग्रजी माध्यमात मुलांना प्रवेश मिळण्यासाठी पालक काहीही करण्यासाठी तयार असतात. पण, मुलांना मराठी शाळेत घालायला तयार होत नाहीत. त्यामुळे पालकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे.
-अनिल बोरनारे, अध्यक्ष, शिक्षक परिषद मुंबई विभाग
>मराठी शाळांविषयीचे गैरसमज
शाळांचा दर्जा खालावलेला आहे
शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत नाही
वेळेवर अनुदान मिळत नाही
या शाळांत शिकल्यावर करिअर कसे होणार
सुविधा उपलब्ध नाहीत
पाल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होईल
>इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे दुष्परिणाम
गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतेच असे नाही
पाल्याला दोन भाषांमध्ये गोंधळ
निर्माण होणे
पाल्य अभ्यास समजून न घेता, घोकमपट्टीवर भर देते
पालकांवर शुल्काचा अधिक भार पडतो
विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत बदल