Join us

‘डाॅन’च्या हस्तकांची दुबईत सेलिब्रेशन पार्टी, बॉलिवूड स्टार्सना ४० कोटी रुपये दिल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 6:23 AM

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे दाऊदचे हस्तक म्हणून ओळखले जातात.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित दोन लोकांनी सुरू केलेल्या अवैध सट्टाबाजी ॲपचे यश साजरे करण्यासाठी येत्या १८ सप्टेंबर रोजी दुबईत आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये बॉलीवूडमधील अनेक नामांकित अभिनेते व अभिनेत्रींना ४० कोटी रुपयांपर्यंत रक्कम दिल्याच्या संशयावरून ईडीने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर छापेमारी केली आहे.     

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे दाऊदचे हस्तक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणांनी लूक आऊट नोटीसदेखील यापूर्वी जारी केलेली आहे. या दोघांनी अवैधरित्या सट्टाबाजी आणि कॅसिनोची सुविधा देणारे महादेव ॲप अलीकडेच सादर केले होते. या ॲपला उत्तम प्रतिसाद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी त्याचे यश साजरे करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी दुबईत एका पार्टीचे आयोजन केले आहे. 

अभिनेत्यांचीही होणार चौकशी ?बॉलीवूडमधील अनेक प्रमुख अभिनेते व अभिनेत्रींनी महादेव ॲपचे जोरदार प्रमोशन केल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यातच अनेक स्टार्सना पार्टीसाठी पैसे देऊन आमंत्रित केल्यामुळे ईडीचे अधिकारी लवकरच यामधील बॉलीवूडच्या मंडळींची चौकशी करणार असल्याचे समजते.

परदेशात सहा हजार कोटींची उलाढाल या ॲपवर भारतात जरी बंदी असली तरी परदेशात या ॲपद्वारे अनेक जण सट्टेबाजी करत आहेत. या ॲप कंपनीने आतापर्यंत सहा हजार कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहितीदेखील ईडीच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून भारतातून मिळालेला पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईत पोहोचल्याचीही माहिती आहे. या ॲपवरून पोकर, पत्ते, क्रिकेट, बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस, फूटबॉल अशा अनेक खेळांसाठी सट्टेबाजी झाल्याचेही दिसून आले आहे. 

     या पार्टीच्या आयोजनाचे काम त्यांनी मुंबईस्थित एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले होते. या कंपनीने या पार्टीकरिता बॉलीवूडमधील अनेक प्रथितयश अभिनेत्यांना बोलावले आहे.      या पार्टीसाठी त्यांना करारबद्ध करत सुमारे ४० कोटी रुपये दिले असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली.      हे पैसे या ॲप कंपनीने अवैधरित्या कमावलेल्या पैशांतूनच दिले असल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीच्या कार्यालयावर छापेमारी केली. 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालय