दुबईत कर्जबाजारी झालेल्याला भारतात अटक

By admin | Published: May 31, 2017 06:40 AM2017-05-31T06:40:30+5:302017-05-31T06:40:30+5:30

दुबईतून बनावट पासपोर्टवर भारतात प्रवेश करणाऱ्या एका भारतीयाला सोमवारी रात्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात

In Dubai, the debtor was arrested in India | दुबईत कर्जबाजारी झालेल्याला भारतात अटक

दुबईत कर्जबाजारी झालेल्याला भारतात अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दुबईतून बनावट पासपोर्टवर भारतात प्रवेश करणाऱ्या एका भारतीयाला सोमवारी रात्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासह त्याला हा पासपोर्ट बनवून देणाऱ्या एजंटविरुद्ध सहार पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करत भारतीयाला अटक केली. तर एजंटचा शोध सुरू आहे.
एम. मुथ्थू असे या अटक करण्यात आलेल्या भारतीयाचे नाव आहे. तो मूळचा केरळचा आहे. बारा वर्षांपूर्वी तो भारतातून दुबईला कामानिमित्त गेला. त्या ठिकाणी तो पर्चेस एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होता. १२ वर्षांत त्याच्यावर सत्तर हजार दिनार एवढे कर्ज झाले होते. त्यामुळे संबंधित कंपनीने त्याचा पासपोर्ट ठेवून घेतला. पासपोटअभावी तो भारतात येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने दुबईत एका एजंटची भेट घेत त्याच्याकडून बनावट पासपोर्ट बनवून घेतला. त्याच्या आधारे त्याने तिकीटदेखील काढले आणि तो भारतात आला. मात्र त्याच्या कागदपत्रांवर सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याला मध्येच अडविले आणि त्याच्याकडे बोर्डिंग पास मागितला. पास नसल्याचे सांगितल्यावर अधिकाऱ्यांनी त्याची अधिक चौकशी केली. त्यात तो खोटे बोलत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याने आणलेला बनावट पासपोर्ट त्याला एजंटने एका ठिकाणी ठेवण्यास सांगितला होता. तेथून एजंटचा माणूस तो पासपोर्ट ताब्यात घेणार होता. मुथ्थू आणि त्या एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजंटचा शोध सुरू असल्याचे सहार पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: In Dubai, the debtor was arrested in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.