Join us

सर्वसामान्यांची दुबईवारी आणखी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

निर्बंधांत वाढ; ३० जूनपर्यंत भारतीयांवरील प्रवासबंदी कायमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वसामान्यांची दुबईवारी आणखी लांबणीवर पडली आहे. कारण ...

निर्बंधांत वाढ; ३० जूनपर्यंत भारतीयांवरील प्रवासबंदी कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वसामान्यांची दुबईवारी आणखी लांबणीवर पडली आहे. कारण भारतीय प्रवाशांवरील बंदी ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिरातीने (युएई) घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत संयुक्त अमिरातीत जाणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईकरांची विशेष पसंती दुबईला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा विचार करता, मुंबई विमानतळावरून जवळपास १ लाख ६० हजार १६९ प्रवाशांनी दुबईवारी केली. इतर आंतरराष्ट्रीय ठिकाणांच्या तुलनेत कोरोनाकाळात परदेशात जाणाऱ्यांमध्ये ही संख्या सर्वाधिक होती. परंतु, एप्रिलमध्ये भारतात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्याने त्याची धास्ती घेत युएई प्रशासनाने भारतीय प्रवाशांवर निर्बंध लागू केले.

दि. २५ एप्रिलपासून तर भारतीय प्रवाशांना अमिरातीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. तिचा कालावधी आधी १४ जून आणि आता ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. युएईचे नागरिक, गोल्डन व्हिसाधारक आणि शासकीय मोहिमेवर असलेल्यांनाच यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे दुबईला जायचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

युएईव्यतिरिक्त आणखी २० देशांनी एप्रिलच्या मध्यावर भारतीय प्रवाशांवर निर्बंध लागू केले आहेत. त्यात प्रवासी विमानांवर बंदी (कॅनडा, हाँगकाँग) किंवा अत्यावश्यक गटाव्यतिरिक्त अन्य प्रवाशांना प्रवेश नाकारणे (अमेरिका, जर्मनी) अशा नियमांचा समावेश आहे.

* चार्टर विमानेही ‘बंधनात’

संयुक्त अरब अमिरातीने प्रवासी विमानांवर बंदी घातली असली तरी त्यांच्या नियमावलीत चार्टर विमानांचा उल्लेख नव्हता. याचा फायदा घेऊन खासगी जेट विमानांनी दुबईच्या फेऱ्या वाढवल्या. त्यामुळे युएई हवाई वाहतूक निर्देशनालयाने चार्टर विमानांवरही निर्बंध लागू केले. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत चार्टर विमानांद्वारे आठहून अधिक प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही.

.............................................