Join us

निकाल जाहीर न झाल्याने सनद हुकली, विद्यार्थ्याची खंत, निकालाचा गोंधळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:57 AM

नोव्हेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ संपलेला नाही. पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आल्याने, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नसल्याचा विद्यापीठाचा दावा फोल ठरला आहे.

मुंबई : नोव्हेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठात सुरू असलेला निकालाचा गोंधळ संपलेला नाही. पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला अपयश आल्याने, विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नसल्याचा विद्यापीठाचा दावा फोल ठरला आहे. सातत्याने दोन महिने पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचा फॉलोअप घेऊनही निकाल न मिळाल्याने, एका विद्यार्थ्याची सनदची मुदत संपल्यामुळे वर्ष वाया गेले आहे. हातात निकाल नसल्यामुळे एलएलएमचा अभ्यासही हा विद्यार्थी आता करू शकत नाही.मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने केली. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना बसत आहे. तीन वर्षे विधि अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्रातील ‘लॉ आॅफ एव्हिडन्स’ पेपरमध्येही मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. याचा फटका एका विद्यार्थ्याला बसला आहे. त्याचे वर्ष वाया गेल्याची माहिती त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तो म्हणाला की, अन्य सर्व पेपर्समध्ये मी चांगल्या गुणांनी पास झालो आहे, पण ‘लॉ आॅफ एव्हिडन्स’ या पेपरमध्ये मला नापास केले आहे. त्यामुळे हा पेपर मी पुनर्मूल्यांकनासाठी टाकला होता, तसेच विद्यापीठाने आॅनलाइन, तसेच विद्यापीठात सुरू केलेल्या मदत कक्षाशीही मी संपर्क साधला होता, पण त्यांच्याकडून मला कोणतेच उत्तर मिळाले नाही, तसेच दोन महिन्यांपासून पुनर्मूल्यांकनासाठी पाठपुरावा करत आहे, पण अजूनही माझा पेपर तपासलेला नाही. २८ आॅक्टोबरला सनदची मुदत संपली. निकाल हाती नसल्यामुळे माझी ही संधी हुकली. ‘एलएलएम’ला प्रवेश घेतला होता, पण निकाल न मिळाल्याने आता माझे वर्ष वाया गेले आहे.कुणाचाही अंकुश नाहीमनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी सांगितले की, निकाल विलंबाबाबत विद्यापीठाकडे चौकशी केली असता विधि अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. विद्यापीठावर आता कोणाचाच अंकुश राहिलेला नाही.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ