नेटफ्लिक्सच्या व्यसनामुळे ‘तो’ तरुण पालकांपासूनही दुरावला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 02:20 AM2018-11-18T02:20:54+5:302018-11-18T02:21:12+5:30

नेटफ्लिक्सच्या वेडापायी १९ वर्षांचा तरुण पालकांपासून दुरावला आहे. आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात या तरुणाच्या प्रेयसीनेही तो तिला अचानक टाळायला लागल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

 Due to the addiction of Netflix, it also disturbed it from the young parent | नेटफ्लिक्सच्या व्यसनामुळे ‘तो’ तरुण पालकांपासूनही दुरावला

नेटफ्लिक्सच्या व्यसनामुळे ‘तो’ तरुण पालकांपासूनही दुरावला

googlenewsNext

- स्नेहा मोरे

मुंबई : नेटफ्लिक्सच्या वेडापायी १९ वर्षांचा तरुण पालकांपासून दुरावला आहे. आॅक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात या तरुणाच्या प्रेयसीनेही तो तिला अचानक टाळायला लागल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघांवरही आता केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात उपचार सुरू आहेत. या तरुणाच्या आयुष्यावरच नेटफ्लिक्स व्यसनाने ताबा मिळविला असून, त्यातून त्याची सुटका करण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर उभे ठाकले आहे.
१९ वर्षांच्या या तरुणाच्या प्रेयसीनेच आपल्या प्रियकराच्या पालकांना त्याच्यावर उपचार करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार, केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी त्या तरुणावरही उपचार करण्याचा निर्णय घेतला. डॉ. पारकर यांनी याविषयी सांगितले की, ‘त्या’ तरुणाला उपचारांकरिता रुग्णालयात आणणे याच टप्प्यापासून आव्हानांचे सत्र सुरू झाले. सुशिक्षित कुटुंबातील तरुणाला पालकांनी रुग्णालयात आणले. मात्र, पहिल्या व्हिझिटमध्ये त्याच्याशी संवाद साधताना तो नजरेला नजर देण्यास, संवाद साधण्यासही तयार नव्हता. नेटफ्लिक्समुळे आलेली व्यसनाधीनता अत्यंत गंभीर टप्प्यावर असून, त्याला वास्तवाचे भानही उरलेले नाही.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकांनीही त्याच्या वागणुकीविषयी अभ्यास न करणे, कॉलेजला न जाणे, संवाद न साधणे, रात्री जागरण करणे, एकलकोंडा होणे, घरातच बसून असणे अशा अनेक तक्रारींचा सपाटा लावला आहे. पालकांनी बोलण्याचा प्रयत्न केल्यास तो दाद देत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. पारकर यांनी सांगितले की, त्याच्या दुसऱ्या व्हिझिटमध्ये त्याने अ‍ॅपविषयी डॉक्टरांना सांगितले. शिवाय त्याच्या संपूर्ण दिनक्रमाचीही माहिती दिली. पालकांना या व्यसनाची गंभीरता लक्षात आल्याने ते धास्तावले आहेत.

त्याला शिक्षण देणार
तरुणाला या व्यसनापासून दूर राहण्यासाठी पहिल्यांदा ही समस्या असल्याची जाणीव करून देण्यात येईल. त्यानंतर, त्याला अ‍ॅपपासून दूर राहण्यासाठी अन्य कामांमध्ये गुंतविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, त्याचे समुपदेशनही करण्यात येणार असल्याचे केईएमच्या डॉक्टरांनी सांगितले.

तिच्यावरही उपचार सुरू
पश्चिम उपनगरात राहणाºया २४ वर्षीय तरुणीवरही केईएममध्ये उपचार सुरू आहेत. नेटफ्लिक्सच्या व्यसनामुळे तिने उचललेले आत्महत्येचे पाऊल त्यामुळे आलेले नैराश्य दूर करण्यासाठी तिच्यावरही बिहेव्हीअर थेरपी सुरू आहे. याशिवाय, समुपदेशनाद्वारेही तिच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

नेटफ्लिक्स म्हणजे काय?
हे स्ट्रीमिंग अ‍ॅप असून या माध्यमातून वर्षाला पैसे भरून सदस्यत्व घेऊन चित्रपट, वेबसीरिज, मालिका पाहता येतात. अ‍ॅपमधील कंटेट रात्रंदिवस मोबाइलमध्ये पाहण्याची सोय आहे.

स्मार्ट फोन्स वापरावर बंदी
‘त्या’ तरुणाला तूर्तास स्मार्ट फोन्स वापरावर बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्याच्यासाठी हे कठीण आहे. त्यामुळे त्याच्या पालकांना त्याच्याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पुढच्या टप्प्यात तरुणावर बिहेव्हीअर थेरपी करण्यात येणार आहे.
- डॉ. शुभांगी पारकर, विभागप्रमुख, मानसोपचार विभाग, केईएम रुग्णालय

Web Title:  Due to the addiction of Netflix, it also disturbed it from the young parent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.