लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असल्याने विकासकामांमध्ये अडीच हजार कोटींची कपात केल्यानंतर आता महसुली खर्चातही २० टक्के कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आपापल्या विभागातील खर्च कशा प्रकारे कमी करता येईल? काटकसरीसाठी त्यांनी काय नियोजन केले आहे? याबाबत १५ दिवसांत अहवाल पाठविण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे मार्च ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पालिकेच्या उत्पन्नात ५९ टक्के घट झाली आहे. परिणामी विकासकामे, कोरोना, प्रशासकीय खर्चासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत ठेवीतून साडेचारशे कोटी, तर आकस्मिक निधीतून ८५९ कोटी रुपये उचलण्यात आले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे आता कामकाज सुरू झाले तरी उत्पन्नामध्ये वाढ होण्यास थोडा अवधी लागणार आहे.
सध्या पालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली असताना खर्च मात्र वाढला आहे. त्यामुळे आर्थिक बाजू पुन्हा भक्कम होईपर्यंत काटकसरीचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागातील महसुली खर्चात कपात करीत अनावश्यक खर्च टाळण्याची सूचना वित्त विभागाने सर्व विभागप्रमुखांना ३ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे केली आहे. प्रशासकीय खर्च निवृत्ती वेतन, विकास निधी आणि अन्य आवश्यक उत्पन्न वगळता अन्य सर्व खर्चांना येत्या काळात कात्री लावण्यात येणार आहे.1सन २०२० - २०२१ या आर्थिक वर्षात पालिका प्रशासनाने ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये १४ हजार ३६७ कोटी रुपये पायाभूत प्रकल्प व नागरी सेवांवर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र या खर्चात अडीच हजार कोटींची कपात करण्यात आली आहे.2उत्पन्नात मोठी घट झाल्यामुळे पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सागरी किनारा मार्ग, रस्ते विभाग, घनकचरा व्यवस्थापन, पदपथ, भायखळा येथील राणी बागेचे नूतनीकरण अशा विकास कामांच्या खर्चात आता कपात करण्यात आली आहे.