पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरवस्था
By admin | Published: July 11, 2015 10:34 PM2015-07-11T22:34:01+5:302015-07-11T22:34:01+5:30
खोपोली पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची पडझड झाली असून या इमारतीचा वापर गर्दुल्ले व अवैध कामासाठी होत आहे. ज्या इमारतीमधून शहरातील कायदा व सुव्यवस्था
- अमोल पाटील, खालापूर
खोपोली पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीची पडझड झाली असून या इमारतीचा वापर गर्दुल्ले व अवैध कामासाठी होत आहे. ज्या इमारतीमधून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले जात होते, तीच इमारत सध्या अखेरचा श्वास घेत असल्याचे चित्र आहे.
मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत ही इमारत असल्याने या इमारतीच्या जागेवर विश्रामगृह तयार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
औद्योगिक वसाहत निर्माण झाल्याने खोपोली पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. खालापूर पंचायत समितीच्या मालकीची समाज मंदिराची इमारत भाडे तत्त्वावर घेऊन खोपोली पोलीस ठाण्याचा कारभार अनेक वर्षे सुरू होता. काही वर्षांनी खोपोली पोलीस ठाण्याची स्वतंत्र इमारत झाल्याने जुन्या इमारतीकडे दुर्लक्ष झाले आहे. या इमारतीमध्ये मोकाट गुरांचा वावर सुरू झाला असून बेकायदा उद्योगही सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी शासकीय विश्रामगृह रायगड जिल्हा परिषदेने उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विविध खात्यांचे मंत्री, अधिकारी खोपोलीत दौऱ्यावर असतात, खोपोलीत एकही विश्रामगृह नसल्याने संबंधितांची गैरसोय होते. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने आपल्या मालकीच्या या जागेत विश्रामगृह बांधण्याची मागणी होत आहे. बांधकाम विभागाच्या मालकीचे विश्रामगृह शीळफाटा येथे असले तरी त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.