Join us

गणेशोत्सव रद्द करून दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Published: September 25, 2015 2:41 AM

चारकोप परिसरात गेली नऊ वर्षे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला गणेशोत्सव यंदा रद्द करून एका गणेशोत्सव मंडळाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अभिनेते

मुंबई : चारकोप परिसरात गेली नऊ वर्षे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला गणेशोत्सव यंदा रद्द करून एका गणेशोत्सव मंडळाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनारसपुरे यांच्या नाम फाउंडेशनला २ लाखांची रक्कम सुपुर्द केली. युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल अ‍ॅण्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टतर्फे कांदिवलीच्या चारकोप परिसरात गेली १७ वर्षे युनायटेड दहीहंडी आणि सुख-समृद्धी सार्वजनिक गणेशोत्सव ९ वर्षे साजरा केला जातो. या उत्सवांना स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. मात्र या वर्षी या संस्थेने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आपल्याकडून शक्यतोपरी मदत व्हावी यासाठी म्हणून दहीहंडी रद्द केली, त्यानंतर आलेला गणेशोत्सवही रद्द केला. या दोन्ही उत्सवांवर होणारी दोन लाखांची रक्कम गुरुवारी नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या स्वाधीन केल्याचे संस्थेचे अध्यक्ष रेजी अब्राहम यांनी सांगितले. सार्वजनिक उत्सव साजरे करताना अन्य मंडळांनीही अधिकाधिक शक्य होईल ती मदत दुष्काळग्रस्तांना करावी. ती एक प्रकारे ईश्वरसेवाच होईल, अशी अपेक्षाही रेजी अब्राहम यांनी व्यक्त केली. या वेळी वेल्फेअर ट्रस्टचे कार्यकर्ते तसेच या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)