नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक बंडखोरी शिवसेनेत झाली आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचे प्रभाग भाजपाला सोडल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. शिवसेना वाचविण्यासाठी निवडणूक लढविण्याची घोषणा करत भगवे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. निवडणुकीपूर्वी काँगे्रस व राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून शिवसेनेने ताकद वाढल्याचे चित्र निर्माण केले होते. आता सत्तेपासून कोणीच रोखू शकत नसल्याचे नेते बोलू लागले होते. परंतु शिवसेना - भाजपाची युती जाहीर झाली व अनेकांची उमेदवारी धोक्यात आली. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे प्रभाग भाजपाला सोडण्यात आले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या एम. के. मढवी यांना तीन प्रभाग देण्यात आले. शिवराम पाटील, नामदेव भगत यांना दोन प्रभाग देण्यात आले. नेत्यांनी आयात कार्यकर्त्यांची काळजी घेतली व निष्ठावंतांना डावलल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नेरूळमधील उपजिल्हा प्रमुख के. एन. म्हात्रे यांनी थेट राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला आहे. नगरसेवक सतीश रामाणे यांच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सीवूडमध्ये विभाग प्रमुख सुमित्र कडू, शाखा प्रमुख संतोष दळवी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.नेरूळ पूर्वमधील शाखा प्रमुख अरुण गुरव यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्यांचा प्रभाग भाजपाला सोडल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. विभाग प्रमुख संतोष मोरे यांच्या पत्नीनेही अर्ज दाखल केला आहे. कोपरखैरणेमध्ये श्वेता म्हात्रे, राजेंद्र आव्हाड यांनीही बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अशोक येवले, सुनील हुंडारे व इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. कोपरीतील परशुराम ठाकूर यांनी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे बंडखोर शिवसैनिकांनी भगवे झेंडे घेवून, रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. शिवसेना टिकविण्यासाठी आमचे बंड असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)
उमेदवारी डावलल्याने शिवसेनेला खिंडार
By admin | Published: April 08, 2015 12:37 AM