सीमा महांगडेमुंबई : नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) राखीव जागांवरून पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश राखीव जागांऐवजी खुल्या प्रवर्गातून ग्राह्य धरण्यात येत असल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत.मुंबईसह राज्यातील महाविद्यालयांमध्ये लॉ, इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र मागासवर्गीय, एसटी त्यांच्यासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेशासाठी फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करायची आहे. शहरातील अनेक विद्यार्थ्यांकडे सध्या प्रमाणपत्रे नाहीत. त्यामुळे त्याने राखीव प्रवर्गातून प्रवेश अर्ज भरला असला तरी त्याचे नाव खुल्या वर्गात नोंदविण्यात येत आहे.सीईटी सेलच्या आधीच्या सूचनेप्रमाणे प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. मात्र २५ जूनच्या सूचनेप्रमाणे ते एका महिन्यात सादर करायचे असल्याची माहिती खुल्या प्रवर्गात नोंद झालेला विद्यार्थी हृतिक डोईफोडे याने दिली. तो एलएलबीसाठी प्रवेश घेत असून त्याच्यासारख्याच आणखी ५०० विद्यार्थ्यांची नोंद खुल्या प्रवर्गात झाल्याची माहिती त्याने दिली.दरम्यान, मागील शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांनी राखीव प्रवर्गाचा लाभ घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे सादर केली होती. त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे प्रवेशातील बनावटगिरीला चाप लावण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई), सीईटी सेल या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहे.> मुदत देणे गरजेचे : राज्य शासनाच्या अखत्यारीतील प्रवेश आणि आरक्षण जाचक अटी, शर्ती लादून नाकारण्यात येत आहे. कमी मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडून मागणे चुकीचे असून शासनाने ते सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देणे गरजेचे आहे.- सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडन्ट लॉ कौन्सिल
जात प्रमाणपत्र नसल्याने खुल्या वर्गातून होणार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 4:58 AM