नियम बदलांमुळे क्रीडा स्पर्धेला ‘खो’, पाठपुरावा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 06:36 AM2017-11-23T06:36:35+5:302017-11-23T06:36:57+5:30
मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून परीक्षा पद्धतीत बदल केले आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून परीक्षा पद्धतीत बदल केले आहेत. या बदलेल्या पद्धतीचा फटका आता खेळाडू विद्यार्थ्यांना बसत आहे. परीक्षा आणि विविध क्रीडा स्पर्धा एकाच वेळी येत असल्याने खेळाडू विद्यार्थी चिंतेत आहेत. कारण क्रीडा स्पर्धेत गेल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे आणि असे केल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल.
पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि तृतीय वर्षापर्यंतच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या विद्यापीठ पातळीवरून पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदापासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे, पण याचा फटका खेळाडू विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण आधी महाविद्यालयीन पातळीवर प्रश्नपत्रिका मिळत असताना, या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येई. त्यामुळे स्पर्धेला गेलेले विद्यार्थी या परीक्षेला बसायचे, पण आता नियमात बदल केल्यावर याबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही. आता आंतर महाविद्यालयीन, आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. काही खेळाडू स्पर्धांसाठी बाहेर गेले आहेत, पण याच वेळी त्यांच्या परीक्षाही सुरू होणार आहेत किंवा सुरू झाल्या आहेत, पण आता परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी या स्पर्धांसाठी जाणार की नाहीत, याविषयी संधिग्दता आहे.
>विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव दिनेश कांबळे यांनी सांगितले, विद्यापीठाच्या नियमात बदल झाले आहेत, पण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्याचे अधिकार हे क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाला आहेत.