बदलत्या हवामानामुळे मुंबईकरांचा ताप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:51 AM2020-03-01T01:51:19+5:302020-03-01T01:51:22+5:30
मुंबईकरांना रात्री वातावरणात निर्माण होणा-या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी हवामानात अचानक होणा-या बदलांमुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे.
मुंबई : दिवसा उन्हाच्या चटक्यांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांना रात्री वातावरणात निर्माण होणा-या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी हवामानात अचानक होणा-या बदलांमुळे आजारांना निमंत्रण मिळत आहे. अनेकांना सर्दी-खोकला, ताप, अंगदुखीने हैराण केले असून पालिका रुग्णालयांत येणाºया रुग्णांची संख्या आठवडाभरात तब्बल दहा टक्क्यांनी वाढली आहे.
हवामानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे झालेला हा परिणाम आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जे आजार तीव्रतेने उसळी मारतात, ते आजार राज्यासह मुंबईमध्ये आताच दिसू लागले आहेत. वातावरणामध्ये झालेल्या या बदलामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना सर्वाधिक त्रास होत असून दमा तसेच श्वसनविकार असलेल्या रुग्णांचेही प्रमाण मागील काही दिवसांत मुंबईमध्ये वाढले आहे.
अॅलर्जी झाल्यानंतर ज्या प्रकारे शिंका येतात, नाक गळते, सर्दी झाल्यानंतर नाकातून पाणी येत राहते, तसा त्रास रुग्णांना होत असल्याचे फिजिशिअन डॉ. राजेश मंगलानी यांनी सांगितले. उष्मा सुरू होतो तेव्हा ताप येण्याचे प्रमाण वाढते, या विचित्र वातावरणामध्ये विषाणू संसर्गामुळे डोकेदुखी, सर्दी तसेच घसादुखी याचा त्रास बळावतो. प्रवृत्तीने उष्ण-तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे हा त्रास वाढतो, असेही त्यांनी सांगितले.
>रुग्ण वाढले तरी यंत्रणा पुरेशी
मुंबईमध्ये या तापाच्या त्रासासह साथींच्या या आजारांचाही धोका असतो. गेल्या १० ते १५ दिवसांपासून दिवसा उकाडा तर रात्री थोडा गारवा असे वातावरण सध्या आहे. कमाल आणि किमान तापमानात अचानक होणाºया या बदलांमुळे जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सर्दी-खोकला, अंगदुखी, घशाचा संसर्ग, ताप असे आजार वाढले आहेत. शिवाय बदललेल्या हवामानामुळे हृदयविकार, मधुमेह, ब्लडप्रेशरच्या रुग्णांवरही याचा परिणाम होत आहे. रुग्ण वाढले असले तरी त्यांच्यावर उपचारासाठी पुरेशी यंत्रणा सक्षम ठेवण्यात आली असून येणाºया प्रत्येक रुग्णावर आवश्यक ते सर्व उपचार केले जात असल्याचे डॉ. मंगलानी यांनी सांगितले.
>मुंबईत दुहेरी वातावरण
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांच्या घरात नोंदविण्यात येत आहे. पूर्वेकडून वाहणारे वारे, समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास उलटणारी सकाळ आणि त्यामुळे दुपारी स्थिर होणारे वारे तापत असून, आर्द्रतेमध्ये नोंदविण्यात येणारे चढउतार या घटकांमुळे कमाल तापमानाचा ‘ताप’ वाढत आहे. विशेषत: याउलट म्हणजे मुंबईचे रात्रीचे किमान तापमान २० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. परिणामी रात्र गार आणि दिवस गरम असे दुहेरी वातावरण मुंबईत नोंदविण्यात येत आहे.