मुंबई : दिल्लीमध्ये झालेली गारपीट, वाऱ्याने बदललेली दिशा आणि उत्तरेकडून वाहणारे वारे; या प्रमुख घटकांमुळे राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवसांत मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावरून थेट २४ अंशावर घसरले आहे. कमाल तापमानात १० अंशाची घट नोंदविण्यात आली असून, मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १४.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर राज्यात सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे ९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.भारतीय हवामान शास्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
मागील चार दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानात कमालीची घट नोंदविण्यात आली आहे. कमाल तापमान ३४ अंशावरून थेट २४ अंशावर घसरले आहे. कमाल तापमानात १० अंशाची घट झाली असून, रात्रीसह दिवसाही मुंबईकर गारठले आहेत. शुक्रवारी दिवसभर मुंबईत गार वारे वाहत होते. दिवसा वाहत असलेल्या गार वाºयाने मुंबईकरांना हुडहुडी भरल्याचे चित्र होते. विशेषत: शुक्रवारी दिवसाच्या वातावरणात गारवा कायम असतानाच शनिवारसह रविवारीही मुंबईचे किमान तापमान १३ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, मुंबईकर आणखी गारठणार आहेत.कोकण, गोवा, मराठवाड्यात उद्या पावसाची शक्यतागोव्यासह संपूर्ण राज्यात ९ फेब्रुवारी रोजी हवामान कोरडे राहील. तर, १० फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. ११ ते १२ फेब्रुवारीदरम्यान कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारसह रविवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २५, १३ अंशाच्या आसपास राहील.