मुंबई बाजारपेठेत थंडीमुळे खजूरसह बाजरीलाही मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:28 PM2018-12-08T20:28:13+5:302018-12-08T20:28:31+5:30

बाजारगप्पा : थंडी सुरू झाली की, मुंबईकरांची आरोग्याविषयी जागरूकताही वाढते.

Due to cold weather in the Mumbai market, the demand for bajara along with dates is also increased | मुंबई बाजारपेठेत थंडीमुळे खजूरसह बाजरीलाही मागणी वाढली

मुंबई बाजारपेठेत थंडीमुळे खजूरसह बाजरीलाही मागणी वाढली

Next

- नामदेव मोरे, (नवी मुंबई)

थंडी सुरू झाली की, मुंबईकरांची आरोग्याविषयी जागरूकताही वाढते. व्यायामाबरोबर आहारामध्येही बदल केले जातात. बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून खारीक, खजूर व बाजरीची आवक वाढली आहे. डाळींचे वाढलेले दरही नियंत्रणामध्ये येऊ लागल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळू लागला आहे. 

बाजार समितीच्या धान्य व मसाला मार्केटमध्ये सर्वच वस्तूंची आवक समाधानकारक होऊ लागली आहे. १५ दिवसांमध्ये थंडीची चाहूल लागल्यामुळे खारीक व खजूर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत. देशात फारसे उत्पादन होत नसल्यामुळे या दोन्ही वस्तूंची आयात करावी लागते. सद्य:स्थितीमध्ये पाकिस्तान व आखाती देशातून रोज १५० ते २०० टन खारकांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये ९० ते १५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. रोज तीन ते चार टन खजूर विक्रीसाठी येऊ लागले आहेत. सौदी अरेबिया, मध्य पूर्वेकडील देश, इस्रायल व इतर देशांमधूनही खजुराची आवक होत असून, होलसेल मार्केटमध्ये ७० ते १३५ रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

खजुरामध्ये खनिज, कॅल्शिअम, अमिनो अ‍ॅसिड, फॉस्फरस, व्हिटॅमिन भरपूर असल्यामुळे व मधुमेह असणाऱ्यांनाही त्याचा लाभ होत असल्यामुळे याला वर्षभर मागणी असतेच; पण थंडीत त्यामध्ये दीडपट ते दुप्पट वाढ होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाण्याचे प्रमाणही वाढत असते. यामुळे पूर्वी १० ते १५ टन बाजरीची रोज आवक होत होती. १५ दिवसांपासून ही आवक प्रतिदिन २५ ते ३० टन एवढी झाली आहे. मराठवाडा व इतर ठिकाणांवरून काही प्रमाणात आवक होत असते; पण सर्वाधिक आवक ही गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेशमधून होत असते. सद्य:स्थितीमध्ये उत्तर प्रदेशमधील आवक वाढू लागल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

मुंबईमध्ये दोन आठवड्यांमध्ये गव्हाची आवक कमी होऊ लागली आहे. आवक सरासरी ७०० ते ९०० टन होऊ लागली होती; परंतु सद्य:स्थितीमध्ये ३०० ते ५०० टन आवक होत आहे. यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. लोकवन गहू २६ ते ३२ वरून २५ ते ३१ झाला आहे. नियमित वापराचा गहू २२ ते २६ रुपये प्रतिकिलोवरून २३ ते २७ एवढा झाले आहेत. तांदळाचे दरही एक रुपयांनी वाढले आहेत. सद्य:स्थितीमध्ये तांदळाची रोज १,५०० ते २,२०० टन आवक होत आहे. गहू व तांदळाच्या भाववाढीमध्ये गंभीर काही नसून, नियमित अशा प्रकारचे चढ-उतार होत असतात, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.थंडी सुरू होताच डाळींचे बाजारभावही नियंत्रणामध्ये येऊ लागले आहेत. तूर डाळीची किंमत प्रतिकिलो ७५ ते ८० रुपये झाली होती.

सद्य:स्थितीमध्ये १५० ते २०० टन तूर डाळीची आवक होत असून, बाजारभाव ५५ ते ७० रुपये झाले आहेत. चना डाळीचीही ५० टन आवक होत असून, बाजारभाव ५८ ते ७० वरून ५५ ते ६० रुपये एवढे झाले आहेत. मुंबईकरांना रोज सरासरी ६० टन शेंगदाणे लागतात. त्याचे दर ६५ ते ८२ वरून ६० ते ८० रुपये झाले आहे.

Web Title: Due to cold weather in the Mumbai market, the demand for bajara along with dates is also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.