‘कोसळधारे’मुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कटले, मुंबई पोलीसांचे रस्त्यावर टिष्ट्वटरद्वारेही मदतकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 02:07 AM2017-08-30T02:07:17+5:302017-08-30T02:08:10+5:30
ऐन गणेशोत्सवात सुरु असलेल्या ‘कोसळधारे’मुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कटले आहे. या आपत्तीत दुर्घटना होऊ नये, यासाठी मुंबईतील २५ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरुन मदतकार्य करत आहे.
मुंबई :ऐन गणेशोत्सवात सुरु असलेल्या ‘कोसळधारे’मुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन विस्कटले आहे. या आपत्तीत दुर्घटना होऊ नये, यासाठी मुंबईतील २५ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरुन मदतकार्य करत आहे. शहर व उपनगरातील बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने रहिवाशांच्या मदतीसाठी पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना कार्यरत असलेल्या हद्दीत तैनात आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक मदतीसाठी नियंत्रण कक्षात दुप्पटीने मनुष्यबळ वाढवून २४ तास सतर्क ठेवण्यात आले आहे.
प्रत्यक्ष घटनास्थळ पोहोचून मदतीबरोबरच पोलिसांच्या टिष्ट्वटरद्वारेही नागरिकांना आवश्यक ती माहिती व मदत पोहोचविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर हे स्वत: नियंत्रण कक्षात थांबून रात्री उशीरापर्यंत परिस्थितीचा आढावा घेत होते. त्यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी कार्यरत होते.
सोमवार रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईकरांना २६ जुलै २००५ च्या आठवणी जाग्या झाल्या. मंगळवारी भरतीचा दिवस असल्याने पावसाचा जोर कायम रहाणार असल्याचे लक्षात आल्याने मुंबईतील सर्व पोलिसांना दक्ष राहण्याची सूचना सकाळी देण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने तिन्ही मार्गावरील उपनगरीय रेल्वे ठप्प झाल्या. तर शहर व उपनगरातील बहुतांश भागात पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली. त्यामुळे आयुक्त पडसलगीकर यांनी सर्व उपायुक्त, अप्पर आयुक्त ते उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाºयांना कार्यरत असलेल्या हद्दीची पाहणी करुन परिस्थितीवर नियंत्रण व नागरिकांना मदत करण्याची सूचना केली. दुरावस्थेचे स्वरुप वाढत राहिल्याने महामार्ग व चौकामध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक वाढविण्यात आली. पाणी साचलेल्या ठिकाणच्या वाहतुकीचे मार्ग बंद करण्यात आले.
५ हजार कॅमेºयाद्वारे पाहणी
शहर व उपनगरात बसविण्यात आलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेºयाद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून नियंत्रण कक्षातून त्याचे नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या मदतीसाठी १०० तसेच ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहसचिव सुधीर श्रीवास्तव यांनी मुंबई नियंत्रण कक्षाला भेट देवून तेथील व्यवस्थेची माहिती घेतली.
हजारो कॉल
सोमवार रात्रीपासून अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीबाबत पोलीस नियंत्रण कक्षात हजारोवर कॉल आले आहेत. पावसामुळे झाडे कोसळलेली, पाणी शिरलेल्या बिल्डींग, सोसायटी, झोपडपट्ट्यांची माहिती नागरिकांकडून पुरविली जात आहे.