Join us

झोपुच्या ‘आसरा’ मोबाइल ॲप्लिकेशनमुळे संपूर्ण कामकाजात पारदर्शकता - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 4:15 PM

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाइल ॲप्लिकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सांगितले.

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ या मोबाइल ॲप्लिकेशनचा उपयोग झोपडपट्टीधारकांना होऊन या प्राधिकरणाच्या संपूर्ण कामकाजात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘आसरा’ मोबाइल ॲप्लिकेशनचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने डिजिटलायझेशनची चांगली सुरुवात केली आहे. झोपडपट्टीवासियांना विविध सोयी सुविधा, योजना यांची माहिती होण्याच्या दृष्टीने या ‘आसरा’ ॲपचा उपयोग नक्कीच होईल. या विभागाने त्यांच्या संपूर्ण कामकाज आणि व्यवहाराचे डिजिटलायझेशन करावे. प्रारंभी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या ‘आसरा’ ॲपचे सादरीकरण करुन माहिती दिली.

‘आसरा’ हे ॲप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती त्यात असणार आहे. जीपीएसच्या मदतीने ‘आसरा’ ॲपद्वारे वैयक्तीक झोपडीची माहिती, प्रस्तावित योजना व झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित असलेल्या योजनांची माहिती या ॲपद्वारे मिळू शकते. तसेच सामान्य झोपडीधारक हे आपली झोपडी व झोपडपट्टीसंबंधित झोपडी क्रमांक, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा, स्लम क्लस्टर 2016 आदी माहिती घेऊ शकतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता आणण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.

यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई