मलनि:सारण कामामुळे रस्त्याची दुरवस्था,पालिका, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:19 AM2018-03-15T02:19:25+5:302018-03-15T02:19:25+5:30
कुर्ला-अंधेरीला जोडणाऱ्या कुर्ला पश्चिमेकडील काळे मार्गावर महापालिकेने मलनि:सारणाचे काम हाती घेतले आहे.
मुंबई : कुर्ला-अंधेरीला जोडणाऱ्या कुर्ला पश्चिमेकडील काळे मार्गावर महापालिकेने मलनि:सारणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, या कामादरम्यान बाहेर निघणारे सांडपाणी भररस्त्यातून वाहत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या कामासाठी यापूर्वीच हा रस्ता एकदिशा करण्यात आला आहे. मात्र, एकदिशा करूनही दुचाकी चालक नियम मोडत असल्याने पादचाºयांना त्रास होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेसह वाहतूक विभागाने या समस्येकडे डोळेझाक केल्याने समस्या सुटण्याऐवजी त्यात भरच पडत आहे.
मुंबई महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी काळे मार्गावरील मलनि:सारणाचे काम हाती घेतले. याकामी काळे मार्ग एकदिशा म्हणजे कमानीकडून बैलबाजार पोलीस चौकीपर्यंत बंद करण्यात आला. तर बैल बाजार ते कमानी असा सुरू ठेवण्यात आला. त्यामुळे वाहनांना लाल बहादूर शास्त्री मार्गाहून मगन नथुराम मार्गे बैलबाजार पोलीस चौकी गाठावी लागत आहे. परिणामी, वाहतूककोंडीने वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत, असे स्थानिक रहिवासी राकेश पाटील यांनी सांगितले. मुळात येथील कामाला विरोध नाही. मात्र, कामादरम्यान वाहनचालकांसह पादचाºयांना त्रास होणार नाही; यासाठी महापालिका आणि वाहतूक विभागाने काहीच उपाय योजलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर कायमचीच वाहतूककोंडी दिसून येते, असेही पाटील यांनी नमूद केले.