लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी झोडपून काढल्यानंतर मंगळवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबापुरीवर जोरदार बरसात केली. मंगळवारी सकाळी उपनगरात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. तर सायंकाळी शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबईतल्या सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. परिणामी वेगवान मुंबईचा वेग मंदावला होता. महत्त्वाचे म्हणजे पावसामुळे ठिकठिकाणी घडलेल्या पडझडीच्या घटनांमुळे मुंबई गारद झाल्याचे चित्र होते.मागील २४ तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर अधिक असून, पावसाच्या माऱ्यामुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पूर्व उपनगरात चांदिवली येथील संघर्ष नगरमधील इमारत क्रमांक ९ लगतचा रस्ता खचल्याची घटना घडली. सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीची ए विंग रिकामी करण्यात आली. शिवाय येथील दोन्ही बाजूंकडील रस्ता बंद करण्यात आला होता. सांताक्रूझ पश्चिमेकडील जुहू येथील समुद्रात दोन मुले बुडाल्याची घटना घडली. यापैकी अंकुर बेटकर याचा मृतदेह सापडला असून, याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात आली. मालाड पश्चिमेकडील बांगूर नगर येथील खाडीत एक इसम पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढत सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साळगावकर यांनी संबंधिताला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले असून, विवेक पवार (३५) असे मृत इसमाचे नाव आहे.
संततधार पावसाने मुंबईकरांना झोडपले
By admin | Published: June 28, 2017 3:45 AM