ठेकेदाराअभावी मलनि:सारण वाहिनीचे काम तीन वर्षे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 05:47 AM2019-11-12T05:47:42+5:302019-11-12T05:47:45+5:30
भांडुप येथे मलनि:सारण वाहिन्या टाकण्यास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम चक्क तीन वर्षे रखडले आहे.
मुंबई : भांडुप येथे मलनि:सारण वाहिन्या टाकण्यास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम चक्क तीन वर्षे रखडले आहे. या काळात कामाचा खर्च वाढला असून निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या एकमेव ठेकेदाराने २८ टक्के जादा दराची बोली लावली आहे. त्यामुळे दोन कोटी ९४ लाखांच्या कामासाठी पालिकेला तीन कोटी ९२ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
भांडुप पश्चिम, खिंडीपाडा येथे ३०० मि.मी. व ४५० मि.मी. व्यासाच्या दोन मलनि:सारण वाहिन्या टाकण्याच्या कामाचे नियोजन २०१५ मध्ये करण्यात आले होते. मात्र एकाच ठेकेदाराने प्रतिसाद दिल्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात आली. त्या वेळी सहभागी दोन ठेकेदारांपैकी मे. स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी पात्र ठरली. परंतु, पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा १२८ टक्के जादा दराची बोली या ठेकेदाराने लावली. त्यामुळे पुन्हा निविदा मागविण्याची वेळ पालिकेवर आली.
२०१७ मध्ये हीच पुनरावृत्ती झाल्याने जुलै २०१८ मध्ये तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. त्यात मे. माय असोसिएटने ४५ टक्के जादा दर भरले. या कंपनीशी वाटाघाटी करीत २७.८७ टक्क्यांपर्यंत दर कमी करून घेण्यात आला. त्यामुळे या ठेकेदाराला पात्र ठरवून त्यालाच कंत्राट देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
>प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर
मलनि:सारण वाहिनीच्या कामासाठी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा जादा दराची बोली ठेकेदाराने लावल्यामुळे आतापर्यंत तीनदा निविदा मागविण्याची वेळ पालिकेवर आली आहे. जुलै, २०१८ मध्ये तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आलेल्या निविदेत मे. माय असोसिएटने ४५ टक्के जादा दर भरले. या कंपनीशी पालिकेने वाटाघाटी केल्या असून, त्यानंतर आता २७.८७ टक्क्यांपर्यंत दर कमी करून घेण्यात आला. अखेर पालिकेने या ठेकेदाराला पात्र ठरवले असून, त्यालाच कंत्राट देण्याचे नक्की केले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.