‘कोरोना’मुळे दहावीचा भूगोल अन् कार्यशिक्षणाचा पेपर रद्द, गुण देण्याबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 07:39 AM2020-04-13T07:39:01+5:302020-04-13T07:39:15+5:30
शिक्षणमंत्र्यांची घोषणा : नववी, अकरावीच्या वार्षिक परीक्षाही टळल्या
मुंबई : लॉकडाउनमुळे रखडलेला इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी एका व्हिडीओद्वारे रविवारी याबाबतची घोषणा केली. याशिवाय, इयत्ता नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा न घेता विद्यार्थ्यांची वर्षभरातील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर त्यांना पुढील वर्गात पाठविण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आपल्या व्हिडीओ संदेशात मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, कोरोनामुळे लागू असलेली संचारबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीची शिल्लक राहिलेली भूगोल आणि कार्यशिक्षण या दोन्ही विषयांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यात कोरोना संसर्गाचे संकट आल्याने भूगोलाचा पेपर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाउन उठवण्यात आल्यास त्याच्या निर्णय झाला असता. पण सध्या लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे.
आता राज्यातील राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या प्रचलित आणि विहीत कार्यपद्धतीनुसार या विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश मंडळाला दिल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
पहिल्या सत्रातील गुणांचा आधार
याशिवाय, इयत्ता नववी आणि अकरावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या सत्रातील चाचणी परीक्षा, प्रात्यक्षिकांमधील गुण आणि त्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यानुसार त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गायकवाड यांनी दिली.
पहिल्यांदाच असे घडल्याने गुण देण्याबाबत संभ्रम
1भूगोल आणि कार्यशिक्षणाचा
पेपर रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गाला काहीसा दिलासा मिळाला, मात्र आता या विषयांच्या गुणांबाबतचा संभ्रम कायम आहे. अशा प्रकारे परीक्षाच रद्द होेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गुण कसे दिले जाणार, विहीत कार्यपद्धती म्हणजे काय, असा प्रश्न आता समोर आला आहे. सध्या तरी यासाठी कोणत्याही पद्धतीची नियमावली नाही.
2त्यामुळे एखादा पेपर गहाळ झाल्यास किंवा एखादी दुर्घटना घडल्यास
त्या-त्या घटनेपुरता निर्णय मंडळाची
समिती घेते. त्यामुळे आता मंडळाच्या
विविध समित्यांसमोर भूगोल आणि कार्यशिक्षणाबाबतचा विषय ठेवला जाईल. त्यावर समितीत चर्चा होऊन कार्यवाहीचा प्रस्ताव मंडळाकडून तयार केला जाईल.
हा प्रस्ताव मंजुुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल. या मंजुरीनंतरच निकाल लावण्यात येईल.
3सध्या बेस्ट आॅफ फाइव्हच्या धोरणानुसार निकाल लावले जातात. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. मात्र या पेपरचे गुण कसे आणि किती ग्राह्य धरावे ? ग्राह्य धरावे क ी धरू नये याबाबतचा निर्णय मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची समिती घेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.