मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यामुळे या कामाला पुन्हा वेग मिळणार आहे. जुलै महिन्यापासून काम ठप्प असल्याचा मोठा फटका या प्रकल्पाला बसला आहे. पाच महिने प्रकल्प ‘जैसे थे’ स्थितीत असल्याने तब्बल ७७० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थगिती उठताच लवकरात लवकर सागरी मार्गाच्या कामाला महापालिका सुरुवात करणार आहे. मात्र झालेल्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यातून कोस्टल रोडचे वचन दिले होते. देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावर (कोस्टल रोड) १३ आॅक्टोबर २०१८ पासून काम सुरू झाले. त्यानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड तयार होऊन मुंबईकरांचा प्रवास चार वर्षांत सुसाट होणार आहे. सुसाट होणाऱ्या या प्रवासामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार असला तरी या प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याने प्रकल्पाचे काम रखडले होते.या प्रकल्पांतर्गत प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत ९.९८ किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडचे काम महापालिकेमार्फत होणार आहे. वर्षभरात या प्रकल्पाचे १२ टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र, या प्रकल्पाच्या मार्गात आलेल्या अनंत अडचणींमुळे सागरी मार्गाचे काम लांबणीवर पडले आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा दावा करीत अॅड. श्वेता वाघ, स्टॅलिन दयानंद, डेबी गोयंका आणि वरळी कोळीवाडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिल्यामुळे पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली. मात्र, तिथेही उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत स्थगिती दिल्याने कोस्टल रोडचे काम गेले पाच महिने ठप्प होते.पाच महिन्यांत ७७० कोटींचे नुकसानप्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंत कोस्टल रोडच्या कामासाठी पालिकेला १३ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील.१३ आॅक्टोबर २०२२ पर्यंत म्हणजे चार वर्षांत सागरी मार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली. १७ टक्के काम झाले आहे.गेले पाच महिने काम बंद असल्याने रोज सुमारे पाच ते सात कोटींचे नुकसान होत होते. असे एकूण ७७० कोटींचे नुकसान पालिकेला सोसावे लागले आहे.प्रिन्सेस स्ट्रीट ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम एल अॅण्ड टी तर बडोदा पॅलेस ते वांद्रे सी-लिंकपर्यंतचे काम एससीसी-एचडीसी ही कंपनी करीत आहे.