मुंबई : शहर-उपनगरात दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काही नागरिकांना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. कारण व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे पुढील काही दिवस श्वसन वा नाक, घसा यांच्याशी निगडित काही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचनाही डॉक्टरांनी केली आहे.फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाच्या व अस्थमाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे ३0 ते ४0 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी सांगितले. दिवाळीनंतर श्वसनाच्या व अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साइड आदी घटक हवेमध्ये सहजासहजी मिसळत नसून त्याचा थर हा जमिनीपासून ५०० ते १००० फुटांवर तरंगत राहतो. त्यामुळे वृद्ध व्यक्ती तसेच लहान मुलांना श्वसन विकाराचा अधिक त्रास होतो. तसेच अस्थमाचा अटॅक, ब्राँकायटिस, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी असे विकारही वाढीस लागतात.हवामानातील बदलांमुळे श्वसनाच्या विकारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या वर्षी आॅक्टोबरपर्यंत पाऊस पडला. त्याचसोबत हवेतील प्रदूषणामध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिक अस्थमा, ब्राँकायटिस, अॅलर्जी आणि घसा बसणे यांसारख्या तक्रारींवर उपचार करून घेण्यासाठी येत आहेत, अशी माहिती छातीआणि श्वसनाच्या विकाराचे तज्ज्ञडॉ. आदित्य अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.डॉ. अग्रवाल म्हणाले की, अॅलर्जीच्या रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेसार्वजनिक वाहनांचा वापर करताना तोंड झाकून घ्या. फटाके उडवू नका. अॅलर्जीच्या रुग्णांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.सध्या ताप, सर्दी आणि खोकला असणाºया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी उपचारांसाठी येणाºया रुग्णांमध्ये जवळपास ३०-४० टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर खबरदारी म्हणून लोकांनी भरपूर कोमट पाणी प्यावे. तसेच थंड पदार्थ आणि पेयांचे सेवन टाळावे, अशी माहिती जनरल फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी दिली.>१३ जणांवर उपचार, चार जण गंभीरदिवाळीतील फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्याने सर जे.जे. रुग्णालयात १३ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील नऊ जणांच्या डोळ्यांवर उपचार करून सोडून देण्यात आले आहे. मात्र चार मुलांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.चारही जणांच्या एका डोळ्याची दृष्टी अधू झाली असून त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
फटाक्यांच्या धुरामुळे श्वसन विकारांच्या रुग्णांमध्ये वाढ, अस्थमाचा अटॅक, ब्राँकायटिस, घसा बसणे, डोकेदुखी असे प्रकार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 6:40 AM