वांद्रे वसाहतीमधील धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:41 AM2018-04-13T02:41:12+5:302018-04-13T02:41:12+5:30

वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमधील इमारतींच्या बांधकामाची पडझड सुरूच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे.

Due to the danger of the Bandra colony, | वांद्रे वसाहतीमधील धोका कायम

वांद्रे वसाहतीमधील धोका कायम

Next

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमधील इमारतींच्या बांधकामाची पडझड सुरूच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही काहीच मार्ग निघत नसल्याने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व सुरू असतानाच गुरुवारी पहाटे ३च्या सुमारास वसाहतीमधील एका इमारतीच्या घरातील छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ईशान मिसाळ हा बारा वर्षीय मुलगा जखमी झाल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार तक्रार करूनही वांद्रे वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होत नसल्याने आता न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
शासकीय वसाहतीचे बांधकाम १९६१ साली करण्यात आले. क्लास १ ते ४ या विभागांत शासकीय वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. यात क्लास १ व ४मध्ये ११ इमारती आणि क्लास २ व ३मध्ये ३५ चौक आहेत. प्रत्येक चौकात १० इमारती आहेत. येथे ४ हजार २०० घरांची मोठी शासकीय वसाहत आहे. वसाहतीत ब-२१२ ते २२१ चौकातील इमारतीमधील ब/ २१३ रूम नंबर ७मध्ये गुरुवारी स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. दुर्घटनेत प्रमिला मिसाळ यांचा मुलगा ईशान (१२) हा झोपेत असताना त्याच्या डोक्यावर आणि हातावर छताचा भाग कोसळला. त्यात तो गंभीर जखमी असून त्याच्या डोक्याला चार टाके, तर हाताला सहा टाके पडले आहेत. दरम्यान, ईशान जखमी झाल्यापासून तो घरामध्ये एकटा राहण्यास घाबरत आहे, असे त्याच्या आईने सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १३ मार्च २०१८ रोजी बैठक घेतली. या वेळी माफक दरात मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचा संस्थेकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर सकारात्मक चर्चा झाली. परंतु निर्णय झालेला नाही. रहिवाशांनी घर स्वखर्चाने दुरुस्त करावे आणि स्वत:च्या जबाबदारीवर राहावे, असे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो. नोटीस देऊन हात वर केले जातात. आम्ही जर सर्व कर भरतो तर मग आम्हाला न्याय का मिळत नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
पहाटे ३च्या सुमारास छताचा भाग कोसळला. डोक्याला आणि हाताला मार लागला. छताचा भाग कोसळला तेव्हा डोळ्यांसमोर अंधेरी आली. काही क्षणांसाठी काहीच सुचत नव्हते. भीतीपोटी घरातून इकडून तिकडे फिरत होतो. डोळ्यांत धूळही गेली होती. आई-वडील कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याकारणाने मी घरात एकटा राहतो. परंतु या दुर्घटनेमुळे घरात राहायची भीती वाटू लागली आहे. शुक्रवारी शेवटचा पेपर आहे. पण या भीतीमुळे पेपरच्या अभ्यासात मन लागत नाही. अभ्यासावर याचा परिणाम झाला तर जबाबदार कोण?
- ईशान मिसाळ, जखमी मुलगा
>सार्वजनिक बांधकाम विभागाला छत कोसळल्याच्या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांचे कामगार
येऊन डेब्रिज काढण्याचे काम सुरू करण्यात आले. आता स्वखर्चाने घराचे काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण सार्वजनिक बांधकाम विभाग लक्षच देत नाही.
- प्रमिला मिसाळ, रहिवासी

Web Title: Due to the danger of the Bandra colony,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.