अंबरनाथ : अंबरनाथ नगपरिषदेने १५ वर्षांपूर्वी उभारलेले वडवली शॉपिंग मार्केट आता धोकादायक स्थितीत असून तिच्या देखभालीकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने छताचा एकेक भाग कोसळत असून तिला गळती लागली आहे. त्यामुळे ही इमारत येथील गाळेधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. या दुमजली मार्केट मधील काही मोजके गाळे भाडेतत्वावर दिले असून ९० टक्के गाळे रिकामे असल्याने पालिका प्रशासनही त्या इमारतीकडे दुर्लक्ष करीत आहे. जे व्यापारी येथे व्यापार करीत आहेत ते देखील आपला जीव मुठीत घेऊन आहेत. पालिका दुरूस्तीसाठी कोणताच खर्च करीत नसल्याने स्लॅबमधील लोखंडही गंजले आहे. त्यामुळे छताचे प्लॉस्टर पडत आहे. इमारतीचे अनेक खांबही धोकादायक स्थितीत आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. या इमारतीची नियमित स्वच्छता देखील करण्यात येत नाही. एवढेच नव्हे तर येथील शौचालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे या इमारतीचे छत हे रात्रीच्यावेळी दारु पिणाऱ्यांचा हुकमी अड्डा झाला आहे. यामुळे त्यावर दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. पालिकेचा कोणताच सुरक्षारक्षक येथे नसल्याने ही अवस्था झाल्याचे मार्केटमधील दुकानदार सांगतात.वडवली मार्केटच्या शेजारील खुल्या जागेवर पालिकने शेड उभारुन ही जागा फेरीवाल्यांना देण्याची तयारी केली होती. भाजी विक्रेत्यांनी येथे व्यापार करावा अशी अपेक्षा पालिकेची होती. मात्र आता या जागेवर भाजी विक्रेते नसून तिचा वापर स्थानिक नागरीक कार पार्किंगसाठी करीत आहेत. (प्रतिनिधी)
पालिकेचे वडवली मार्केट धोकादायक स्थितीत
By admin | Published: June 28, 2015 2:20 AM