मुलीच्या मृत्यूमुळे रहिवासी आक्रमक, टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:10 AM2019-11-21T03:10:02+5:302019-11-21T03:10:14+5:30
विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल; डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक कोसळून १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू
मुंबई : डोक्यावर सिमेंटचा ब्लॉक कोसळून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चेंबूरमध्ये घडली. या प्रकरणी संतप्त रहिवाशांनी बुधवारी विकासकाविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले. टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. या प्रकरणी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर येथील अमर महल परिसरातील पंचशीलनगरमध्ये इमारतीवरून सिमेंटचा ठोकळा डोक्यावर पडल्याने प्रतिभा शिंगारे (१०) या मुलीचा मंगळवारी मृत्यू झाला. पंचशीलनगर येथील एसआरए इमारतीच्या ए विंगमध्ये १४व्या मजल्यावर प्रतिभा तिच्या आत्याकडे राहत होती. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीत प्रवेश करत असताना, वरून अचानक प्रतिभाच्या डोक्यात सिमेंटचा ठोकळा पडला. यामुळे ती गंभीर जखमी झाली.
जखमी अवस्थेत तिला तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी साडे ९च्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रतिभाच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे.
रहिवाशांना तिच्या मृत्यूबाबत समजताच त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. विकासकामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप त्यांनी केला. तसेच विकासकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीवर अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला.
याविरुद्ध मुलीच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी बुधवारी विकासकाविरुद्ध कारवाईची मागणी करत आंदोलन छेडले. पंचशीलनगर येथील एसआरएच्या अर्धवट इमारतीमध्ये तेथील विकासकाने कुठलेही सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे १० वर्षांच्या प्रतिभाला जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच विकासकावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी सुरुवातीला प्रतिभाची आई छब्बू यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरोधात कलम ३३८ खाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर, कुटुंबीयांच्या मागणीनंतर, विकासकासह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी दुजोरा दिला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
चार तासांनंतर आंदोलन मागे
पंचशीलनगर येथील रहिवासी बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास टिळकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा घेऊन गेले. यावेळी तब्बल दीडशे ते दोनशे नागरिकांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देऊन बसला होता. मृत मुलीचे नातेवाईकदेखील आंदोलनात सहभागी झाले होते. विकासकावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही व मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा रहिवाशांनी घेतला. यावेळी पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे चार तासांनी रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले.
अर्धवट बांधकाम केलेल्या इमारतीतच वास्तव्य
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अमर महल येथील पंचशीलनगरमध्ये विकासकाद्वारे एसआरए प्रकल्पांतर्गत इमारत बांधण्यात आली आहे. येथे इमारतीचे बांधकाम अर्धवट स्थितीत असून सोईसुविधांचाही अभाव आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारीदेखील केल्या आहेत. इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून वर रहिवाशी राहतात. पहिल्या, दुसºया व तिसºया मजल्यावर अद्यापही काम सुरू आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणाहून ठोकळा मुलीच्या डोक्यात पडला. आमच्या तक्रारीची विकासकाने व प्रशासनाने दखल न घेतल्याने तिला जीव गमवावा लागला.